Top Newsराजकारण

शरद पवारांनी ८१ व्या वाढदिवसाला काढली अस्वस्थ करणारी आठवण; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबईः लोकांचं म्हणणं, समस्या, अनुभव ऐकण्यासाठी, समजण्यासाठी, त्या सोडवण्यासाठी अक्षरशः पायाला भिंगरी लावून फिरलेले नेते म्हणजे शरद पवार. आज त्यांचा ८१ वा वाढदिवस. नेहरू सेंटर येथे पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांनी आपल्या आयुष्यावर प्रभाव करणारे सामान्य लोक, अनुभव वृद्धींगत करणाऱ्या लोकांचा खास उल्लेख केला. या लोकांमुळेच मी समृद्ध झालोय आणि अजूनही त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी खूप काम करायचंय, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. लोकांमधील अंतर कमी करण्यासाठी अजूनही मन सतत अस्वस्थ असतं, असं सांगताना त्यांनी एका कवितेचा आवर्जून उल्लेख केला.

भाषणात बोलताना शरद पवार म्हणाले, कवीचं नाव मोतीराज राठोड असावं. त्यांची कविता आठवते. मोतीराज हा बंजारा समाजातील कार्यकर्ता. पालंमध्ये राहणारा. मी सहज त्याला म्हटलं काय हल्ली विचार करतो. तो म्हणाला विचार करतो तुमच्या सर्वांच्या विरुद्ध! मी म्हटलं म्हणजे काय? तो म्हणाला माझी एक लहानशी कविता आहे. कविता काय आहे . कवितेचं नाव होतं पाथरवट. पाथरवट म्हणजे छन्नी हातात घेऊन दगड फोडणारे. शरद पवार यांनी भाषणात पुढे या कवितेत कवीने नेमकं काय म्हटलं आहे, त्यानं कोणती वेदना मांडली आहे, याविषयी सांगितलं.

कवितेतील भाव, कवीच्या वेदना सांगताना पवार भाषणात म्हणाले, कवी म्हणतो, हा मोठा दगड आम्ही घेतला. आमच्या घामानं, कष्टानं, हातोड्यानं आणि हातातल्या छन्नीनं त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर केलं. आणि मूर्तीत रुपांतर केल्यानंतर सर्व गाव आलं. मूर्ती बनविणाऱ्याकडे कुणी ढुंकून बघत नव्हतं. सगळं गाव आलं आणि गावाने वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात स्थापित केली. गंमत काय माझ्या घामाने मूर्ती तयार झाली. पण मूर्ती तयार झाल्यानंतर मंदिरात मी दलित आहे. म्हणून मला आता प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे. पण तिचा बापजादा मी आहे. त्या मूर्तीचा बापजादा मी आहे. मी असताना तुम्ही मला मंदिरात येऊ देत नाही. ही तुमची समाज रचना आम्हाल उद्ध्वस्त करायची आहे, खरं सांगतो अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वत गुन्हेगार आहे असं वाटतं. आपण काही केलं असो नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या उपेक्षित समाजावर जे अन्याय अत्याचार झाले, त्याची जी अस्वस्थता आहे ती दुरुस्त करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे.

लोकांमध्ये मिसळायला बरं वाटतं

वाढदिवसानिमित्तच्या भाषणात शरद पवार म्हणाले, मी महाराष्ट्रात फिरत असतो. लोकांना भेटल्यावर मला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळतं. त्यांचं गाऱ्हाणं ऐकायला मिळतं. अनेक ठिकाणी मी जातो. अनेकदा मी छोट्या समाजातून आलेल्या लोकांसोबत दिवस घालवले आहे. अनेकांना ऐकायला बरं वाटतं. अलिकडच्या काळात लिहिणारे विचार करणारे अनेक लोक तयार झालेले मिळतात. कालच मी एक गोष्ट सांगितली. एकदा मी औरंगाबादला होतो. मी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मिलिंद कॉलेज आहे. सरस्वती शिक्षण संस्था आहे. तिथे दलित वर्गातील तरुण तरुणी औरंगाबादला शिकायला येतात. कारण तिथे पहिलं महाविद्यालय बाबासाहेबांनी काढलं. बाबासाहेबांनी कॉलेज काढलं म्हणून तरुण तरुणींना आकर्षण आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत अनेक संध्याकाळी गप्पा मारल्या आहेत. त्यांच्या मनात काय आहे. अन्याय अत्याचारवर त्यांचं काय म्हणणं आहे. ते ऐकायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडवण्याला मदत होईल.”

महाराष्ट्रात चमत्कार झाला, तोच २०२४ मध्ये दिल्लीत होईल : भुजबळ

शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात जो चमत्कार झाला. तोच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल, असा दावा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

शरद पवार यांचा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईत व्हर्च्युअल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला संबोधित करताना भुजबळ यांनी हे विधान करून राजकीय चर्चांना वाट मोकळी करून दिली आहे. संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीत होईल. त्यासाठी पवारांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन भुजबळांनी केले.

यावेळी भुजबळांनी पवारांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातील कार्याचा धावता आढावा घेतला. देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवारांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न,धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

पवारांनीच ओबीसींना आरक्षण दिलं

आजवर अनेक संकटांना पवारांनी तोंड दिले आहे. किती जरी मोठ संकट त्यांच्यासमोर आलं तरीदेखील पवारांचा संयम कधीही ढळणार नाही ही अतिशय विशेष बाब आहे. आज देशभरात जो ओबीसींचा प्रश्न गाजत आहे. त्या ओबीसी समाजाला सर्व प्रथम महाराष्ट्रात आरक्षण देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालं. राज्यात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासोबत अनेक क्रांतीकारी निर्णय त्यांनी घेतली. त्यामुळे महाराष्ट्र एका उंचीवर पोहचला, असं ते म्हणाले.

भाजपची कथनी एक आणि करणी दुसरी

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी आपले अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. मात्र एकीकडे ज्यांनी सरकारमध्ये असतांना ओबीसींसाठी अध्यादेश काढला. त्याच पक्षाचे पदाधिकारी कोर्टात या आरक्षणाला आवाहन देत आहे. यावरून विरोधकांची कथनी एक आणि करणी एक असून मुंह में राम और बगल छुरी अशी भूमिका आहे, अशी टीका त्यांनी केली. आज ओबीसी आरक्षणाला विरोध होत आहे. उद्या देशातील इतर आरक्षणाला देखील विरोध होईल. आरक्षण काढून टाकण्याचा छुपा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न उधळून लावण्याची सर्व ओबीसीसह इतर नागरिकांची जबाबदारी आहे. तुमच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्याना येणाऱ्या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला ठेऊन त्यांना आपल्या दारात उभं करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

अजित पवार यांचे दाटलेल्या आवाजातले भाषण

उपमुख्यमंत्री अजित पवारही बोलायला उभे राहिले. पण शरद पवारांबद्दल बोलताना अजित पवार भारावून गेले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता. पवारांबद्दल भरभरून बोलताना एका क्षणी अजितदादा अत्यंत भावूक झाले. त्यावेळी त्यांनी मला फार काही सूचत नाही, शब्द बाहेर पडत नाही, अशी भावना व्यक्त करून आपलं भाषण थांबवलं. त्यामुळे उपस्थित कार्यकर्तेही हेलावून गेले होते.

पवार साहेबांबद्दल अनेकजण विचार करतात. त्यांच्या पद्धतीने ते विचार करतात. राज्यातील प्रत्येक घटकांवर साहेबांच्या विचाराचा ठसा आहे. त्यांची नोंद घेतल्याशिवाय देशाचा आणि राज्याचा इतिहास लिहिता येणार नाही. हे पवार साहेबांचं मोठेपण आहे. पवार साहेब हे साहित्यिक, सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक विश्वात आख्यायिका बनून राहिले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला हिमालयाची उंची आणि सह्याद्रीचा भक्कमपणा आहे. अहोरात्र कष्ट करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. सर्वांकडे बारकाईने लक्ष देणं, सर्वांना संस्कार देणं, सामाजिक बांधिलकी देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यांनी केवळ आम्हालाच नाही तर लाखो तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी बळ दिलं. प्रेरणा दिली. तुमच्या माझ्या सारखे लाखो तरुण साहेबांकडे आधारवड म्हणून बघतात, असं सांगतानाच अजितदादांचा कंठ दाटून आला होता.

साहेब म्हणजे समृद्ध विद्यापीठ

साहेब म्हणजे व्यक्ती नाही तर ज्ञानाने आणि अनुभवाने समृद्ध असं जागतिक विद्यापीठ आहे. ही माझी नाही तर माझ्यासह देशातील प्रत्येक माणसाची दृढश्रद्धा आहे. राज्यातील सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री असे विक्रम त्यांच्या नावावर आहे. सामाजिक जीवनाची ६० वर्षे त्यांनी पूर्ण केली. आज ८१ व्या वर्षीही ते सर्वांच्या गळ्यातील ताईत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

पवारांचा वाढदिवस म्हणजे महाराष्ट्रातील जाणत्या राजाचा हा वाढदिवस. शेतकऱ्यांच्या पाठिराख्याचा हा वाढदिवस. वंचित घटकांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा वाढदिवस. आदिवसींसाठी निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा हा वाढदिवस. महिला, अल्पसंख्याकासाठी निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचा हा वाढदिवस. गेली 60 हून अधिक वर्ष महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या कर्मयोग्याचा हा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबप्रमुखाचा हा वाढदिवस आहे. हा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावं. प्रत्येक घटकांपर्यंत पवारांचे विचार पोहोचवा. तरुणांपर्यंत त्यांचा विचार न्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

मी सर्वांचीच भाषण ऐकत होते. त्यांनी सांगितलं. दर महिन्याच्या प्रत्येक शनिवारी प्रत्येक गावाला तुम्ही जायचं आहे. जे जे पहिल्या शनिवारी आपल्या गावात जाणार आहात तर तुमच्या गावातील सरपंच तरी तुमच्या विचाराचा तरी असावा. नाही तर बरेच पुढारी, देशाचं आणि राज्याचं राजकारण करतात. पण गावाचा सरपंच त्यांचं ऐकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदींच्या सल्ल्यावर प्रफुल पटेल यांचे पॉवरफुल्ल उत्तर

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांचे कौतुक केले. पटेल म्हणाले की, शरद पवार हे शेतकऱ्यांबद्दल तळमळीने बोलतात म्हणून नाही, तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करुन दाखवलं आहे. ५० वर्षांपूर्वी आपण अन्नधान्याच्या वस्तू आयात करायचो. पण आज या देशातून लाखो कोटींच्यावर अन्नधान्य निर्यात करत आहोत. इतके महत्त्वपूर्ण योगदान कृषी क्षेत्रात शरद पवारांनी दिले आहे. हे योगदान सामान्य माणूस आणि शेतकरी कधीही विसरू शकणार नाही, असं पटेल यांनी सांगितले.

पटेल यांनी शरद पवारांबाबत एक किस्सा देखील सभागृहात उपस्थित असलेल्या नेत्यांना सांगितला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितलं की, शरद पवारांना सांगा कोरोनामध्ये इतके फिरू नका, ते जिकडं-तिकडं जात आहेत. पूर आला, वादळ आलं ते त्याठिकाणी जात आहेत. त्यांना म्हणावं, थोडी तब्येतीची काळजी घ्या. परंतु मी त्यांना म्हटलं ते कुणाचे ऐकत नाहीत. कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात, असं पटेल म्हणाले.

आमच्या नेत्याला ५ लाखांचा सूट घालावा लागत नाही : अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांबाबत कौतुकोद्गार काढले. शरद पवार हे शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत. महिलांना लष्करात भरती, राजकारणात आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्याची अमंलबजावणी केली. याच महिलांना आज प्रगतीची शिखरे गाठली आहेत, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. तसेच शरद पवार हे गेली ४० वर्ष दिल्लीतील राजकारणाची ओळख बनून राहिले आहेत. आमच्या नेत्याला पाच लाखाचा सूट घालावा लागत नाही. हजारो रुपयांचे तैवानी मशरुम खावे लागत नाही, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोलाही लगावला.

कोल्हे भाषणात पुढे म्हणाले की, देशातील कुठल्याही नेत्याला शरद पवारांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. भुज भूकंपावेळी शरद पवार यांची माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील वाहवा केली होती, अशी आठवण अमोल कोल्हे यांनी यावेळी करुन दिली. तसेच जर २६ खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर ४८ खासदार असलेल्या महाराष्ट्रातील व्यक्ती पंतप्रधानपदावर का बसू शकत नाही?, असा सवाल उपस्थित करत याबाबत विचार करण्याची गरज असल्याचे देखील अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

शरद पवार हे पॉवर हाऊस, त्यांचा नेम अचूक : जयंत पाटील

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवारांवर स्तुतिसुमने उधळली आहेत. शरद पवार हे पॉवर हाऊस नेते आहेत. त्यांचा नेम अचूक असतो. त्यांच्या निर्णयामुळे परिवर्तन होते, हा इतिहास आहे. महाराष्ट्रात, देशात माणसे कशी जोडायची, हे पवारांनी शिकवले, असे कौतुकोद्गार जयंत पाटील यांनी काढले. मराठवाडा विद्यापीठ नामकरण, महिलांचे आरक्षण तसेच महाविकास आघाडी निर्माण करण्याचा निर्णय आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. यामुळे परिवर्तन झाले. देशातील कोणत्याही नेत्याला त्यांचे मार्गदर्शन घ्यावे लागते, असे पाटील म्हणाले.

विचारांची लढाई उभी करायची असेल, तर गावागावात जाऊन विद्यार्थ्यांचे, तरुणांचे मार्गदर्शन घ्यावे. विद्यार्थी राष्ट्रवादीला आम्ही एवढेच सांगतो की, २०२४ चा विचार करू नका. त्यापुढचा विचार करा. लोकापर्यंत पोहोचण्यासाठी तळागाळातल्यांशी संवाद साधावा. काँग्रेस पक्षाने सेवादल नावाची संघटना स्थापन केली. महात्मा गांधींचा विचार त्यामागे होता, असेही पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत. त्यांनी कृषी, संरक्षण क्षेत्रात ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शरद पवार आहेत, या शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button