संभाजीराजेंची मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (maratha reservation) मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाविषयी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती (sambhajiraje chhatrapati) यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन केले आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही? हे मला सरकारला विचारायचे आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले. १०२ व्या घटनादुरुस्तीच्या बाबतीत सविस्तर संवाद व्हायला हवा व सरकारने तुझं माझं करण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
मी काही या वर्षीच आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर आलेलो नाही. सन २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. २०१३ ला आझाद मैदानात माझ्या नेतृत्वात मोर्चा काढला होता. तेव्हा नारायण राणे समितीने दिलेले आरक्षण टिकले नाही. त्यानंतर २०१७ ला देखील मुंबईत महामोर्चा निघाला होता, तेव्हा मला व्यासपीठावर जावे लागले होते. तेव्हा मोर्चाला काहीतरी गालबोट लागू शकते म्हणून मला आलेल्या लोकांना परत जाण्यास सांगावे लागले होते. मराठा समजाच्या आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
उच्च न्यायालायने मराठा समाजाला सामाजिक मागास असे सिद्ध केल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाने याला स्थगिती दिली होती. आता १५ ते २५ मार्च दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात अंतिम सुनावणी होणार आहे. सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता. वेळोवेळी सरकारची भूमिका बदलत गेली? काही ठोस नियोजन आहे की नाही?, असा सवाल संभाजीराजे यांनी यावेळी बोलताना सरकारला केला आहे.
दरम्यान, सत्तेत बसणारे ज्या भावनेने निवडून त्या भावनेला त्यांनी न्याय द्यावा, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढावी, या मागणीचा पुनरुच्चार उदयनराजे यांनी केला. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटी दिल्या. मराठा आरक्षण हाच मुख्य मुद्दा या भेटींमागील होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नसल्याची खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.