आ. भास्कर जाधवांना शिवसेनेकडून मोठे बक्षीस
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने, तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना प्रवक्तेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. भास्कर जाधव यांचे राष्ट्रवादीत असलेले चिरंजीव विक्रांत जाधव यांना नुकतंच रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी शिवसेनेने दिली होती. त्यानंतर आता भास्कर जाधवांनाही ‘मातोश्री’वरुन खास गिफ्ट मिळालं आहे.
शिवसेनेला रत्नागिरी जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनेचे 39 इतकं संख्याबळ आहे. गुहागर मतदारसंघातून विजय मिळवलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव मंत्रिपद न मिळाल्याने काही काळापासून नाराज होते. भास्कर जाधव शिवसेनेत आले असले, तरी त्यांचे सुपुत्र विक्रांत जाधव अजूनही राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे विक्रांत यांना रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपद कसं द्यावं, हा प्रश्न शिवसेनेला होता. मात्र भास्कर जाधवांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेने त्यावर तोडगा काढला आणि विक्रांत जाधवांना अध्यक्षपद देण्यात आलं.
पुतण्याची काकाला धोबीपछाड
जाधवांनी आधी सुपुत्रासाठी अध्यक्षपद पदरात पाडून घेतलं. त्यानंतर आता प्रवक्तेपदाची बक्षिसी भास्कर जाधवांना दिल्याने त्यांची नाराजी काहीशी दूर होण्याची शक्यता आहे. खरं तर भास्कर जाधव यांचे बंधू बाळ जाधव यांच्यासाठी खुद्द शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा होती. परंतु काका आणि पुतण्यामधील शर्यतीत पुतण्याने बाजी मारली.
शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?
संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
अॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
सचिन अहिर – शिवसेना उपनेते (नवीन वर्णी)
सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी) (नवीन वर्णी)
अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन वर्णी)
मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार (नवीन वर्णी)
किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई) (नवीन वर्णी)
डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई) (नवीन वर्णी)
किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन वर्णी)
संजना घाडी (नवीन वर्णी)
आनंद दुबे (मुंबई) (नवीन वर्णी)
भास्कर जाधवांच्या नाराजीची चर्चा
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना पक्षप्रवेशाचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी गुहागर मतदारसंघातून विजय मिळवला. आमदार झाल्यानंतर तसंच शिवसेना सत्तेत आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तेव्हापासून ते सेनेवर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मंत्रिपद न मिळाल्याने आपली नाराजी त्यांनी याअगोदर देखील बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीत असताना त्यांनी महत्त्वाची खाती सांभाळलेली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सेनापक्षप्रमुख आपल्याला मंत्रिपद देतील, अशी आशा त्यांना होती.