सातारा/अहमदनगर : साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व्यसनमुक्ती संघटनेचे दंडवत आणि दंडूका असं आंदोलन केले. यावेळी विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी व महिला नेत्यांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा पोलिसांनी त्यांना पिंप्रद (ता. फलटण) राष्ट्रसंत गुरुवर्य दीक्षित आश्रमातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना साताऱ्यात आणण्यात आलं.
आंदोलनादरम्यान करोना नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांच्यासह १२५ जणावर विविध कलमान्वये सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला. आंदोलनादरम्यान बोलताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडत असतात आणि याचे पुरावेदेखील असल्याचं प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं होतं. यावेळी त्यांनी पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख केला होता.
…ती तर महाविकास आघाडीमधील नेत्यांची जुनीच सवय; चंद्रकांत पाटील
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. बंडातात्या कराडकर यांनी काल वाईन विक्रीच्या निर्णयासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून मोठा गोंधळ उडाला होता. कराडकर यांच्या या वक्तव्याची महिला आयोगाकडून देखील दखल घेण्यात आली होती. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बंडातात्या कराडकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दारूच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो, त्यामुळे आपण बोललो असे कराडकर यांनी म्हटले आहे. आता हा विषय संपवायला हवा. मात्र रोज एखादा नवा विषय काढायचा आणि लक्ष विचलित करायचे ही महाविकास आघाडीची सवयच असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आम्ही विरोधात आहोत म्हणून तर सर्व सुरळीत चालले आहे. नाहीतर या सरकारने काय केले असेत याचा भरवसा नाही असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.
पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, आमची भूमिका ही राज्यातील महाविकास आघाडी सरकारसारखी नाही. आम्ही महाविकास आघाडी सारखे बोलत नाही. आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालये चांगले आणि समजा निकाल विरोधात गेला तर सर्व भाजपच्या इशाऱ्यावर अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. सीबीआयच्या बाबतीमध्ये देखील तेच आहे. तपास बाजूने लागल्यास सीबीआय चांगली विरोधात गेल्यास सीबीआय भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची टीका होते. मात्र आमचा न्यायालयावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही निलंबित बारा आमदारांची लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
किरीट सोमय्या पुराव्याशिवाय बोलत नाहीत
किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता ते म्हणाले की, किरीट सोमय्या जे बोलतात ते योग्य बोलतात. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्याकडे त्या गोष्टींचे पुरावे असतात. सुजित पाटकर यांच्या कंपनीत संजय राऊत आणि त्यांच्या मुलीची भागिदारी आहे, अशा बातम्या येत आहेत. सोमय्या यांनी देखील तसे म्हटले आहे. त्यांच्याकडे त्या संदर्भातील पुरावे असल्याचा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.