राजकारण

‘मायमराठी’साठी भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्याना परखड शब्दात पत्र

मुंबई : सत्ताधारी शिवसेनेने मराठी आस्मितेचा आधार घेत गेली तीस वर्षे मुंबई महानगर पालिकेत सत्ता आपल्या ताब्यात ठेवली, पण गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी माणूसच मुंबईच्या बाहेर फेकला गेला. हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे गेल्या दहावर्षांत मराठी शाळांची संख्या आणि मराठी विद्यार्थ्यांची पटसंख्या निम्म्याहून कमी झाली आहे, याला योगायोगच म्हणावा की मराठीचं नशिब? असा सवाल भाजपाचे अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. तसेच सोशल मीडियावरही त्यांनी व्हिडिओ टाकला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०५ हुतात्म्यांनंतर दि.१ मे १९६० रोजी मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. मुंबईत असलेले हुतात्मा स्मारक आपणास ‘मराठी माणसाने‘ मराठी बाण्यासाठी दिलेल्या बलिदानाची सदैव आठवण करून देते.

मुंबईत सन २०१० -२०११ मध्ये महापालिका मराठी शाळांची संख्या ४१३ होती आणि विद्यार्थी संख्या १,०२,२१४ होती. आता सन २०२०-२०२१ मध्ये शाळांची संख्या फक्त २८० राहिली आहे तर विद्यार्थ्यांची संख्या फक्त ३६,११४. मराठी शाळांना सहा-सहा महिने मुख्यध्यापक मिळत नाही. इतकच नाहीतर २०१३ नंतर आवश्यकतेनुसार शिक्षक भरतीही झाली नाही, अशी सद्यस्थिती असल्याचे आमदार अमित साटम म्हणाले.

मराठी भाषेची अशीच अधोगती सुरू राहिली तर २०२७-२०२८ सालापर्यंत मराठी माणसाला आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्या मुलांसाठी एकही मराठी शाळा उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचेही साटम यांनी म्हंटले आहे. ज्या मायमराठीने गेली ३० वर्ष मुंबई महानगर पालिकेत एकहाती सत्ता शिवसेनेला दिली, त्याच मराठीचे हाल बघून मला कविवर्य कुसुमाग्रज यांचे वाक्य आठवते. “मराठी भाषा मंत्रालयासमोर भीक मागत उभी आहे, अशा काव्यपंक्ती त्यांनी पत्रात खास नमूद करून मराठी भाषेच्या अधोगतीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button