राजकारण

नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढविणार

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना सर्व जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे, अशी माहिती शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली. शिवसेना नेते संजय राऊत पाच दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती शिवसेनेने दिली. पुढील वर्षी नाशिक महापालिका निवडणूक होत आहे.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र ती पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेने बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे शिवसेनेनं चौकाचौकात शाखा उद्घाटनाचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे भाजपनं आता ‘मौका देख के चौका’ मारण्याचं ठरवलं आहे.

राष्ट्रवादीचीही स्वबळाची तयारी

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटन अधिक मजबूत करत कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची कसून तयारी करतेय. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवक पळवले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल रोष आहे. मात्र, असं असलं तरी मनसेची भूमिका कृष्णकुंजवरच ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button