मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबईत शिवसैनिकांनी राणे यांच्याविरोधात बॅनरबाजी केली. त्यामध्ये, नारायण राणे यांचा कोंबडी चोर असा उल्लेख करत राणेंना डिवचलं होतं. आता, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही एक फोटो शेअर करत राणेंना डिवचलं आहे.
शिवसेनेकडून लावण्यात आलेलं हे बॅनर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर, अनेकांनी नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करताना कोंबडीचे फोटो झळकावले. मात्र, आता चक्क खासदार संजय राऊत यांनीच कोंबडीचा फोटो शेअर केला आहे. वाघाच्या जबड्यात अडकलेली तडफडणारी कोंबडी या फोटो दिसत आहे. या फोटोवर आजचा दिवस थोडक्यात.. असं लिहिलं आहे. तर, राऊत यांनीही टुडे… असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. त्यामुळे, आता राणे यांच्याकडूनही संजय राऊतांवर प्रहार केला जाण्याची शक्यता आहे.
Today pic.twitter.com/aykNVylSAZ
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 25, 2021
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून राणेंवर टीका करण्यात आली आहे. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत राणेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे. नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोक असलेला फुगा फुगवून दाखवण्याचे ठरवले आहे.