Top Newsराजकारणसाहित्य-कला

कुसुमाग्रजांबद्दल देवेंद्र फडणवीसांचा अनादर : जयंत पाटील

पुणे: नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देशातील आणि मराठी भाषेतील थोर साहित्यिक म्हणून कुसुमाग्रज यांच्याबद्दल कायम आदर आहे. परंतु विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे कुसुमाग्रज यांच्याबद्दल अनादर दाखवत असतील तर हा साहित्य आणि संस्कृती समोरील सर्वात मोठा यक्षप्रश्न आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर जावी यासाठी ते सतत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत असतात. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा वापर साहित्य संमेलनातील राजकारणासाठी करू नये, अशा शब्दात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला.

जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील सिंचन भवन येथे एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाशिक येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून संमेलनाच्या आयोजकांना त्यांनी टोला लगावत संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना जयंत पाटलांनी फडणवीस यांना टोला लगावला. जयंत पाटील म्हणाले, नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे. कुसुमाग्रज यांचा अपमान करणे म्हणजे मराठी भाषेचा, मराठी वांगमयाचा, मराठी भाषिकांचा अपमान आहे. केवळ शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जावी म्हणून फडणवीस सातत्याने सावरकरांचा विषय काढत असतील तर त्यांनी हे करू नये अशी माझी त्यांना सूचना आहे.

चंद्रकांतदादांनाच घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही !

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकारण आता तापायला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यातील भाजपच्या भव्य अशा कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता जयंत पाटील यांनी चंद्रकांतदादांना खोचक टोला लगावला आहे.

‘आपल्या सगळ्यांचे नेते ज्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं असं स्वप्न आपण पाहतो आहोत आणि जागेपणी पाहत आहोत. त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करत आहोत. लोकांचे आशीर्वाद मिळवत आहोत, असे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय देवेंद्र फडणवीस’, असं वक्तव्य पाटील यांनी पुण्यातील कार्यक्रमात केलं होतं. या वक्तव्यावरुन जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना कोणतीही घाई नाही. चंद्रकांत पाटलांनाच घाई झाली आहे. फडणवीसांचं नाव पुढे करुन ते बोलत आहेत. मात्र, त्यांना तिथे बसायचं आहे. असं असलं तरी त्यांचं नाव यादीतही नाही, अशा शब्दात चंद्रकांत दादांवर खोचक टीका केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button