राजकारण

परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढणार; संजय पांडे करणार चौकशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. सेवेत असताना लिहिलेले पत्र आणि वाझेला दिलेली मोकळीक परमबीर सिंग यांना अडचणीची ठरेल असे दिसत आहे. परमबीर सिंग यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीबाबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोप आणि लिहिलेल्या पत्राची चौकशी राज्य सरकार करणार असून, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे चौकशी करणार आहेत. याबाबतचा आदेश नुकताच गृह विभागाने काढला असून पांडे यांनी चौकशी सुरू केल्याचे खात्रीलायक रित्या समजते. पांडे हे कडक शिस्तीचे, प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात.

राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी संजय पांडे यांची शुक्रवारी रात्री उशीरा राज्याचे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार असून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा पदभार सुद्धा असणार आहे. विशेष म्हणजे आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या १०० कोटी वसुलीचा आरोप करणाऱ्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची नवे पोलीस महासंचालक पांडे हे पत्राची चौकशी करणार आहेत. मुंबई पोलीस दलाकडून याप्रकरणी एक अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार आता चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. परमबीर सिंग हे पोलीस सेवेत असतानाही असे पत्र लिहणे हे शिस्तभंग असू शकते, का याचाही तपास पांडे करणार आहेत.

परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांचे प्रकरण समोर आले. एखाद्या निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्यास सूचना देण्यात येतात. मात्र, अशा सूचना दिल्या असताना देखील सचिन वाझेंना सेवेत घेऊन कार्यकारी पद दिल्यामुळे पोलीस दलातील अनेकांनी विरोध केला होता. तरी देखील वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्यात आले. तसेच सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे वाझे करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचप्रमाणे अवैध धंद्यांबाबतचे छापे इतर कारवाई वाझे पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालीच करत असल्याचे अहवालात म्हटले. या अहवालानंतर आता गृहविभागाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले असून संजय पांडे हे परमबीर सिंग यांची चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटलिया घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे हे प्रकरण सुरु असतानाच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीनंतर त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा आरोप केल्यानंतर परमबीर सिंगयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खडेबोल सुनावले आणि त्यांची याचिका फेटाळली. दरम्यान, उच्च न्यायालयांच्या वकील डॉ. जयश्री पाटील यांनी या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने तिच्या याचिकेवर सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसात त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button