‘ब्लॅक फंगस’वरून संजय राऊत-भाजप नेत्यांमध्ये जुंपली
मुंबई : कोरोना संकट काळात आता देशात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलंय. राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे १ हजाराच्या आसपास सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. एकीकडे या आजाराने रुग्णांचा मृत्यू होत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसवरुन जोरदार राजकारणही पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी विरोधक हे ब्लॅक फंसग असल्याची जहरी टीका केलीय. त्याला भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय.
पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावेळी संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला. कोरोना महामारीत मुंबईत चतांगल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेसह पंतप्रधान मोदींनीही कौतुक केलंय. मात्र, विरोधक त्यावर टीका करत आहेत. शिवसैनिकांनी विरोधकांच्या या टीकेकडे दुर्लक्ष करुन कामाकडे लक्ष द्यावं. कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली.
संजय राऊत यांच्या या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्राला मागच्या दीड वर्षापासूनच ब्लॅक फंगसची लागण झाली आहे. महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला असल्याचा पलटवार लाड यांनी केलाय. तसंच बोलताना जरा भान ठेवून बोला, असा सल्लाही लाड यांनी राऊतांना दिलाय. मुंबई महापालिकेत २ हजार २०० कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतानाच मेलेल्या लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम शिवसेना करत असल्याची टीकाही राऊत यांनी केलीय. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरोना काळात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही लाड यांनी केला.
बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस आहेत.
अच्छा, म्हणून मुख्यमंत्री @OfficeofUT
कायम कडी लावून आणि दडी मरून घरी बसलेले असतात का?लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का?
काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला…
#mahavasooliaaghadi pic.twitter.com/Ow5M0zweJN— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 22, 2021
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही राऊतांवर जोरदार टीका केलीय. ‘बोरु बहाद्दर म्हणतात विरोधक ब्लॅक फंगस आहेत. अच्छा, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायम कडी लावून आणि दडी मारुन घरी बसलेले असतात काय? लोक लाजेपायी दौऱ्यावर गेले तरी धावतपळत जेवायला घरीच येतात का? काय निधड्या छातीचे सत्ताधारी मिळालेत महाराष्ट्राला’, अशा शब्दात भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधलाय.