राजकारण

देवेंद्र फडणवीस राजकारणातील सर्वात लबाड माणूस : अनिल गोटे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार अनिल गोटे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील सर्वात लबाड माणूस असल्याची टीका गोटे यांनी केलीय. जनतेचा पाठिंबा असलेले अर्थात ‘मास लीडर’ संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असल्याचा घणाघात गोटे यांनी केला. ते मुंबईत बोलत होते. चंद्रकांत पाटील हे काही ‘मास लीडर’ नाहीत. त्यांच्या बोलण्यानं सत्य लपत नाही. भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याचा दावा गोटे यांनी केला. तसंच झोटिंग समितीच्या अहवालामुळे खडसेंना काही नुकसान होणार नसल्याचंही गोटे यांनी म्हटलंय.

सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर

अनिल गोटे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचेही कान टोचले आहेत. अनिल गोटे यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. त्याचबरोबर सत्ताचूर झाल्यानंतर आपल्याला कोण किती किंमत देतो? असा टोला गोटे यांनी विरोधी पक्षाला लगावला आहे. आघाडीत सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करीत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्वीकारली आहे. ती आपली जबाबदारी ओळखूनच आनंदाने पार पाडली पाहिजे. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आलं. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत तेंव्हाही खडाजंगी होत असे. पण चुकूनही वृत्तपत्रात एकही वेडी-वाकडी बातमी आली नाही.

याउलट अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पुरवत आहेत, हे काही शोभादायक नाही. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत . याचा अंतर्मुख होऊन प्रत्येकाने विचार करावा. अन्यथा, अशा वर्तवणुकीला “भिकेचे डोहाळे लागले” असेच म्हणावे लागेल, असं गोटे यांनी म्हटलंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button