राजकारण

संभाजी ब्रिगेड-मनसे संघर्ष पेटणार; राज ठाकरेंना प्रबोधनकारांची पुस्तके पाठवणार

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यातील संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं- साहित्य पाठवणार आहे. राज ठाकरेंनी प्रबोधनकारांच साहित्य वाचावं आणि तसा वैचारिक वारसा जपावा, असा सल्लाही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेड पोस्टानं प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं राज ठाकरेंना पाठवणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याशिवाय राज ठाकरेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखणात दंतकथा नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील वाद उफाळला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या आरोपानंतर खुद्द शरद पवारांनीही उत्तर दिलं होतं. राज ठाकरे यांच्यावर न बोललेलंच बरं, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला शरद पवारांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना दिला होता.

शरद पवारांनीही राज ठाकरेंना प्रबोधनकारांचं साहित्य वाचण्याचा सल्ला दिल्यानंतर, संभाजी ब्रिगेडने थेट कृती करण्यास सुरुवात केली आहे. आता संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तकं कुरिअर करणार आहेत.

हिंदुत्वाच्या राजकारणाला शह देण्यासाठी महाराष्ट्रात जातीचं राजकारण सुरू झालं आहे का?, असा सवाल राज यांना करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप केला होता.

संभाजी ब्रिगेडचा पलटवार

राज ठाकरे यांना बाबासाहेब पुरंदरे यांच्यापलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेकडून करण्यात आली आहे. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

मनसेने उडवली श्रीमंत कोकाटेंची खिल्ली

प्रवीण गायकवाड आणि श्रीमंत कोकाटे यांनी राज ठाकरेंवर जहरी टीका केली होती. त्यावरून मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. वसंत मोरे यांनी गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला. त्यावर श्रीमंत कोकाटे यांनी पुणे कुणाच्या बापाचं आहे का? असं म्हणत प्रतिआव्हान दिलं होतं.

श्रीमंत कोकाटे यांच्या टीकेला मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे यांनी उत्तर दिलं आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, श्रीमंत नाव लावून कुणी श्रीमंत होत नसते, विचाराने, कृतीने श्रीमंत असावे लागते. तुम्ही ना कामाचे, ना धामाचे, कसले श्रीमंत, तुम्ही तर दरिद्री विचाराचे आहात असा टोला त्यांनी कोकाटेंना लगावला आहे.

जातीपातीचे राजकारण करून लोकांना जगू द्यायचे नाही ही तुमची नीतिमत्ता आहे. तुम्ही जातीपातीचे राजकारण केले नसते तर खूप मोठे नेते झाले असते. पदवीधर निवडणुकीत आमच्यापेक्षाही कमी मते मिळाली. हे पाहून दळभद्री विचार संपवा आणि विचाराने कर्तृत्वाने श्रीमंत व्हा कोकाटे असा खोचक सल्लाही रुपाली पाटील ठोंबरे यांनी श्रीमंत कोकाटेंना लगावला आहे.

देशात लोकशाही आहे. आपल्याकडे अफगाणिस्तान सारखं तालिबानी राज्य आलेले नाही. राज ठाकरेंना दादरमध्ये फिरू देणार नाही हे हास्यास्पद आहे. तसेच प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच आहे. गायकवाड हेही पुण्याचेच आहेत ना? त्यामुळे पुणे कोणाच्या बापाचं नाय हे मनसेने लक्षात ठेवावं. मनसेच्या राज ठाकरेंना वाटत असेल की पुरंदरेना लोटांगण घातले म्हणून आपण खूप मोठे झालो. तर अशा भ्रमात राहू नका. मी प्रवीण गायकवाड यांच्या भूमिकेचे समर्थन करतो असं श्रीमंत कोकाटे म्हणाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button