ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, पायाला दुखापत; कोलकाताच्या रुग्णालयात दाखल
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली आहे. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत कारमध्ये बसवलं. या घटनेनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपण काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं सांगितलं.
ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये तीन ते चार तासांपासून लोकांच्या भेटीगाठी घेत होत्या. त्यावेळी कोणताही स्थानिक पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात नव्हता. चार-पाच लोकांनी गाडी बंद केली. त्यावेळी कोणताच लोकल पोलीस कर्मचारी नव्हता. एसपी देखील नव्हते. हे जाणूनबुजून करण्यात आलंय. माझ्या छातीतही दुखतंय, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना आता तातडीने कोलकात्याला आणलं जात आहे. कोलकाताच्या व्यूह रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ममता बॅनर्जी यांचे नाटक, भाजप नेत्याचा आरोप
दरम्यान, भाजप नेते अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी नाटक करत आहेत, असा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी खोटं बोलण्यात माहिर आहेत, असा घणाघात अर्जन सिंह यांनी केला. ममता बॅनर्जी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ठाऊक आहे की, आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव होणार आहे. त्यामुळे त्या सहानुभूतीसाठी प्रयत्न करत आहेत, असं अर्जुन सिंह म्हणाले.