मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गुन्हेगारास कठोर शिक्षा सुनावली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानला मुंबईतील कोर्टाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
साकीनाका परिसरात पीडित महिलेवर बलात्कार करुन नराधम आरोपीने तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा संतापजनक प्रकार घडला. या घृणास्पद प्रकरणानंतर मुंबई पुन्हा एकदा महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान या पीडित महिलेला गंभीर अवस्थेत घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
तपासासाठी एसआयटीची स्थापना; ज्योत्सना रासम तपास करणार
साकीनाका बलात्कार प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त ज्योत्सना रासम करणार आहेत. तसंच, आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्योत्सना रासम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आलं आहे. तपास पूर्ण करुन एका महिन्यात हा गुन्हा उघडकीस आणू, असं मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं.
दुर्दैवाने महिलेचा जबाब नोंदवता आला नाही
साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि आरोपपत्र दाखल केलं जाईल, असं नागराळे यांनी सांगितलं.
राष्ट्रीय महिला आयोगाची सुमोटो याचिका
साकीनाका बलात्कार प्रकरणात राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठीचा वेळ सरकारकडे नाही, असा आरोप विरोधक करत आहे. या प्रकरणातील पीडितेचा आज शनिवारी अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. आता या संपुर्ण प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुमोटो याचिका दाखल करत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटूंबीयांना मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपी यांना पत्र लिहित पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.