इतर

अटक टाळण्यासाठी सचिन वाझेंची कोर्टात धाव; १९ मार्च रोजी सुनावणी

मुंबई : ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून दहशतवाद विरोधी पथकानेही त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य कारवाईची शक्यता लक्षात घेऊन वाझे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे हे मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याप्रकरणी तपास करत असलेल्या एटीएसने सचिन वाझे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यादरम्यान, एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वाझे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मनसुख यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने सचिन वाझे यांची मॅरेथॉन जबाबनोंदणी झाली. वाझे यांच्यावर पुढे अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसली तरी या प्रकरणात अटकेची भीती त्यांना सतावू लागली आहे. त्यातूनच त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सचिन वाझे यांनी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला असून या अर्जावर १९ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ एका स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. याप्रकरणी तपास सुरू झाल्यानंतर ही कार ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरन यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार याप्रकरणी तपास करत असलेल्या मुंबई क्राइम ब्रांचच्या टीमकडून मनसुख हिरन यांची चौकशी सुरू झाली. या टीममध्ये सचिन वाझे यांचा समावेश होता. दरम्यान, मनसुख यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने या घटनेला गंभीर वळण लागले. मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत रुतलेल्या अवस्थेत आढळला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्य विधीमंडळात उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट सचिन वाझे यांचे नाव घेऊन आरोप केले. या मृत्यू प्रकरणामागे वाझे असल्याचा दावा फडणवीस यांनी मनसुख यांची पत्नी विमला यांच्या जबाबाचा आधार घेत केला. त्यानंतर सरकारने या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडून एटीएसकडे सोपवला आणि पाठोपाठ सचिन वाझे यांची बदलीही करण्यात आली. वाझे यांना शुक्रवारीच मुंबई पोलिसांच्या नागरिक सुविधा केंद्रात बदली देण्यात आली आहे. यादरम्यान, एटीएसकडून वाझे यांच्यावर कारवाईची शक्यता बळावल्यानेच वाझे अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button