सचिन वाझेचा आणखी एक कारनामा; दोघांच्या एन्काऊंटरचा कट उघडकीस
मुंबई : मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क प्रकरणी एक नवीन आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. हिरव्या रंगाची स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी कार माइकल रोडवर पार्क करण्यात आली होती, ही गाडी पार्क केल्यानंतर दोन दहशतवाद्यांनी उभी केली होती असं दाखवून त्यांचा एन्काऊंटर करण्याचा कट सचिन वाझे आणि टीमने रचला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एक ईको गाडी औरंगाबाद येथून शहर चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरण्यात आली होती. ही गाडी चोरी करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. विद्या अलंकार शाळेजवळील रोडवरुन ती इको गाडी रिव्हर्स घेवून बाहेर काढली गेली आणि नंतर पुढे ती चोरुन नेण्यात आली त्यावेळेस गाडीत एकच व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. गाडी कशाप्रकारे चोरली? त्याच बरोबर औरंगाबादच्या शहर चौकातून ही गाडी चोरून कोणत्या दिशेने गेली? कोणत्या रस्त्याने गेली? आणि कुठे गेली? याचा तपास एनआयए करत आहे. या गाडीतून ते 2 दहशतवादी आले होते असा बनाव केला जाणार आला होता.
ही गाडी नोव्हेंबर महिन्यातच औरंगाबाद येथील शहर चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरण्यात आली होती. विजय नाडे हे एक सरकारी कर्मचारी असून 17 नोव्हेंबर 2020 या दिवशी विजय नाडे यांनी आपली ईको गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. त्या गाडीचा MH 20 FP 1539 हा नंबर होता. ही गाडी विजय नाडे यांचे छोटे बंधू प्रकाश गाडे यांनी ते राहात असलेल्या इमारती जवळील विद्या अलंकार इंग्लिश स्कूलच्या रोडवर उभी केली होती.
साधारणपणे 13 नोव्हेंबरला ईको गाडी प्रकाश नाडे यांनी त्या रोडवर पार्क केली होती आणि 16 तारखेच्या पहाटे विजय नाडे हे काही कामानिमित्त जात असताना ते गाडी ज्या ठिकाणी पार्क केली होती तेथे गेले असता त्यांना गाडी दिसून आली नाही. 16 तारखेच्या दिवसभर विजय नाडे आणि प्रकाश नाडे यांनी ईको गाडी सर्वत्र शोधली मात्र त्यांना ती गाडी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी 17 नोव्हेंबर 2020 या दिवशी औरंगाबाद मधील शहर चौक पोलीस ठाण्यात गाडी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून ही ईको गाडी बेपत्ता होती.
पण ज्यावेळेस सचिन वाझे याला घेऊन एनआयएची टीम मिठी नदी येथे तपासकामी गेली होती. त्यावेळेस मिठी नदीत सचिन वाझे याने गाडीच्या नंबर प्लेट, सीसीटीव्हीचे डीव्हीआर आणि कॉम्प्युटर हार्ड डिस्क यासोबतच अनेक पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मिठी नदीत फेकले होते. हे पुरावे एनआयएने शोधून काढल्यानंतर यात विजय नाडे यांच्या ईको गाडीची नंबर प्लेट सापडली आणि तेव्हापासून ही नंबर प्लेट कोणत्या गाडीची आहे याचा शोध सुरू झाला.
त्यावेळेस या गाडीची सर्व माहिती समोर आली मात्र अजूनही गाडी सापडून आली नसून ही इको गाडी मुंबईत अनेक ठिकाणी फिरल्याचा एनआयएला संशय आहे. याच अनुषंगाने तपास करत असताना याच ईको गाडीची साधर्म्य अशा एका इको गाडीचे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागले, असून ही इको गाडी नेमकी आता कुठे आहे? याचा शोध एनआयए घेत आहे सचिन वाझेच्या इतर कारनाम्यांसारखे ही गाडी देखील या सर्व प्रकरणात महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ईको गाडी शोधण्याकरता एनआयएने विशेष पथक देखील तयार केल्याचे बोलले जात आहे.