राजकारण

बाळासाहेब ठाकरेंवरुन राष्ट्रवादी-भाजपमध्ये ‘ट्विट युद्ध’

रोहित पवारांकडून भातखळकरांचा समाचार

मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना राजकीय शेरेबाजीला रंग चढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार अतुळ भातखळकर यांना चांगलंच धारेवर धरलंय. “युतीत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे.

कोरोनाच्या मुद्द्यावरुन रोहित पवार यांनी केंद्रातील संसद भवानाच्या बांधकामावर टीका केली होती. त्याची दखल घेत अतुल भातखळकर यांनी काही ट्विट करत रोहित पवार यांच्यावर टीका केली. त्याला रोहित पवार यांनी ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं. “युतीत असताना बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते. आता ते फक्त उद्धवजींचे वडील?. भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच,” असे रोहित पवार ट्विटद्वारे म्हणाले.

पुढे त्यांनी राज्यात होणाऱ्या मोफत लसीकरणावरुन भातखळकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. “राज्याची स्थिती नाजूक असतानाही राज्याने लसीकरणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारप्रमाणे लसीकरणाची जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलली नाही,” असं रोहित पवार म्हणाले. सध्या राजकीय वक्तव्य करण्याची वेळ नाहीये. लोकांचे प्राण पणाला लागलेले आहेत, हे विसरु नये. त्यामुळे सध्या राजकीय पतंगबाजी टाळली तर बरं होईल, असा सल्लासुद्धा त्यांनी अतुल भातखळकर यांना दिला.

अतुल भातखळकर काय म्हणाले ?

देशात कोरोनाचा कहर आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो आहे. पण देशात नव्या संसद भवनाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे प्राधान्य कशाला द्यावे याचा विचार करण्याची गरज आहे, असे रोहित पवार म्हणाले होते. त्याला उत्तर म्हणून “मुख्यमंत्री 400 कोटी रुपये खर्चून वडिलांचे स्मारक उभरत आहेत. त्यांना रोहित पवार यांनी लसीकरण महत्त्वाचे की काय हा प्रश्न विचारावा. आपल्या गृहमंत्र्याने फ़क्त मुंबईतून केलेली वसूली दीड हजार कोटी आहे असे म्हणतात. ती रक्कम लसीकरणासाठी वळवा म्हणतो मी,” अशी टिप्पणी भातखळकर यांनी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button