राजकारण

शरद पवारांचं पुन्हा धक्कातंत्र, गृहमंत्रिपदासाठी राजेश टोपेंच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : अनिल देशमुख यांच्याकडून गृहखात्याचा कारभार काढून घेण्यात आला तर या पदासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याचं आतापर्यंत बोललं जात होतं. मात्र आता या पदासाठी राष्ट्रवादीकडून राजेश टोपे यांच्या नावाचा विचार होत असल्याचं कळतंय.

सध्या राजेश टोपे यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाची जबाबदारी आहे. आरोग्यमंत्री म्हणून टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचं राज्यभरातून कौतुक करण्यात आलं. त्यामुळे गृहखात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारीही त्यांच्याकडेच देण्याचा विचार राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी राजेश टोपे यांना दिल्लीतही बोलावून घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकांसह आढळलेली गाडी आणि त्यानंतर या गाडीचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अटक झाली. याच प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडीही करण्यात आली. मात्र हे प्रकरण एवढ्यावरच थांबणार नसून आता थेट गृहमंत्र्यांच्या गच्छंतीची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यात नवी दिल्ली इथं एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. जवळपास 2 तास चाललेल्या या बैठकीत पवार यांनी मुंबईतील घडामोडींबाबत गृहमंत्र्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसंच पोलीस यंत्रणेकडून झालेल्या कारभाराबाबत शरद पवार यांनी गृहमंत्र्यांना जाब विचारल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणावरून शरद पवार हे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून गृहमंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे आणि यासाठी आता शरद पवार पुन्हा आपल्या धक्कातंत्राचा वापर करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button