काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष, माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

महाड : महाडचे माजी आमदार, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचे निधन झाले. वयाच्या ५४ व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन त्यांच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाने कर्तृत्ववान आणि उमदे नेतृत्व गमावल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.
महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती. आज दुपारी २ वाजता महाड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.




