राजकारण

महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकार पडेल, असं म्हणत सातत्यानं डेडलाईन देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानानं साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. सत्तेतले पक्ष सरकार पडू देणार नाहीत, असं पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी आतापर्यंत अनेकदा डेडलाईन दिल्या आहेत. मात्र आता त्यांनी हे सरकार पडणार नसल्याचं म्हटलं आहे. सत्तेत असलेले सगळे जण अतिशय हुशार आहेत. त्यांना सत्तेची ताकद माहिती आहे. आपलं सरकार अपघातानं याची त्यांना कल्पना आहे. सरकार आल्यापासून आपण खूप बदल्या करू शकलो. कार्यकर्त्यांना खूष करू शकलो याची सत्तेत असलेल्या पक्षांच्या नेत्यांना कल्पना आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यानं सरकारमधील पक्षांना सत्तेची ताकद काय असते याची कल्पना आहे. त्यामुळे ते खूप भांडतील. पण सरकार पडू देणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या सातत्यानं आक्रमक विधान करत आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. पटोलेंच्या विधानांमुळे सरकारला धोका पोहोचेल का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला पाटील यांनी उत्तर दिलं.

विरोधकांनी कितीही एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ द्या, ते कोणाच्याही नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवू द्या. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तीन वेळा भेट घेतली. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे विधान केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button