
मुंबई : छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे दोन दिवसीय धर्म संसद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशभरातून धर्माचे अनुयायी आले होते. अकोल्याच्या कालीचरण महाराज याने या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. कालीचरण महाराजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही कालीचरण महाराजावर हल्लाबोल केला आहे. अकोल्याचा कालीचरण महाराज हा भोंदूबाबा; त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा! असं म्हटलं आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे श्रद्धास्थान आहेत. सत्य आणि अहिंसा ही विचारधारा जगाने स्वीकार केली. फर्जीबाबा अकोल्याचा रहिवासी असून नाव कालीचरण महाराज आहे. संपूर्ण ट्विटर बघा, सोशल मीडिया बघा, बातम्या बघा या फर्जीबाबाने राष्ट्रपित्याबद्दल अपशब्द काढले… तो कार्यक्रम कुठेही झाला असेल, तो अकोल्याचा रहिवासी आहे. बापूंच्या विचारांना विरोध असू शकतो. विचारांची लढाई विचारांनी होऊ शकते. अपशब्द वापरण्याचा अधिकार नाही. राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा… महात्मा गांधींचा अवमान करत असेल तर तो आम्ही सहन करणार नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
कालीचरण विरोधात राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करून या महाराष्ट्रामध्ये अटक केली पाहिजे. आपल्याला देशाला, जगाला एक संदेश द्यायचा आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा अपमान या देशात सहन केला जाणार नाही. #MahatmaGandhi pic.twitter.com/WQx3pKCHZt
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 27, 2021
खरं तर नवाब मलिकांनी माफी मागितली पाहिजे. महात्मा गांधींचा अवमान झालं असताना सरकार हातावर हात ठेवून बसतंय. पोलिसांनी अटक का केली नाही? असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
गोडसे का महिमामंडन देश में जब से मोदी सरकार आयी तब से शुरू हो गया। अब मर्यादा लांघकर महात्मा गांधीजी को बदनाम करने का काम चल रहा है। हम मांग करते है की देशद्रोह का मुकदमा दर्ज हो और कालीचरण, जो फर्जी महाराज है उसकी गिरफ्तारी हो। pic.twitter.com/VtI4zvTDmi
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 27, 2021
महात्मा गांधींविषयी अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज याने आक्षेपार्ह विधान केले होते. पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये, महाराष्ट्रातील अकोला येथून येथे आलेल्या कालीचरण महाराज याने महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे म्हटले आहे. त्यांच्या भाषणात समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या विधानांचाही समावेश होता.
कालीचरण बाबावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : नाना पटोले
‘शिवतांडव स्तोत्र’ गायल्यामुळे संपूर्ण देशात चर्चेचं कारण बनलेले कालीचरण महाराज आता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी महात्मा गांधींवर अर्वाच्च शब्दात भाष्य केल्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. काँग्रेसनेदेखील हा मुद्दा लावून धरला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तत्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, कालिचरण नावाचा बाबा जो अकोल्याचा रहिवाशी आहे, त्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरत शिवीगाळ केली. तर दुसरीकडे गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसेचे गोडवे गायले आहेत. महात्मा गांधींना शिव्या घालण्याचे पाप कालीचरण बाबाने केले आहे. या बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ कडक करावी.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार जगभरातील अनेक देश आदर्श मानतात व त्यानुसार वाटचालही करतात. परंतु आपल्याच देशातील काही लोक जाणीवपूर्णक त्यांच्याबद्दल अपप्रचार करतात. त्यांच्याबदद्ल अर्वाच्च भाषा वापरतात हे निंदनिय आहे, असेदेखील नाना पटोले म्हणाले.
रायपूरमध्ये अकोल्याच्या कालीचरण महाराजाविरोधात गुन्हा दाखल
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज याने महात्मा गांधीविषयी अपशब्दांचा वापर केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी रायपूर येथे झालेल्या धर्म संसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
महात्मा गांधींना अकोल्याच्या कालीचरण महाराजाने अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली आहे. यावेळी त्यांनी खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे आता बराच वाद पेटला आहे. कालीचरण महाराज हे फक्त गांधीजींना शिवीगाळ करुन थांबले नाहीत तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचेही त्यांनी आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली.




