अनिल देशमुखांवरील आरोपांची सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः याची माहिती दिली आहे. आता सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे, ते समोर येईल, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
माजी पोलीस आयुक्तांनी माझ्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करावी, अशी मागणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायमूर्तीकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्व आरोपांची चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे, ते समोर येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक गाडी आणि त्यात स्फोटकं सापडली आणि त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक झाली तर दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली. परमबीर सिंग यांची बदली झाल्यावर नाराज परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिले. आणि गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना 100 कोटींचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला.