Top Newsराजकारण

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर ट्विटरवरून आणखी एक ‘फोटोबॉम्ब’ !

मुंबई : नवाब मलिक यांनी मध्यरात्रीनंतर ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये समीर वानखेडे आणि एक अन्य व्यक्ती दिसत आहे. समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याबाबत नवाब मलिक यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नाही. पण, फोटोवरूनच सवाल केला आहे. ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे ?’ असे प्रश्नार्थक ट्विट नवाब मलिक यांनी केले आहे. या फोटोवर नवाब मलिक अधिक स्पष्टीकरण देण्याची शक्यता असून त्यावर समीर वानखेडे हे आपले काय मत मांडतात, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेसमीर वानखेडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. नवाब मलिक दररोज समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. दरम्यान, आता मध्यरात्रीची वेळ साधत नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो ट्विट करत सवालही केला आहे. या फोटोमध्ये समीर वानखेडे हे मुस्लीम वेशात दिसून येत आहेत. नवाब मलिकांच्या या फोटोबॉम्बवर समीर वानखेडे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नवाब मलिक यांनी मध्यरात्री ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोने एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. तिथे गेल्यावरही समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान, समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणात घुसखोरी केली व सरकारी नोकरी मिळवली, असा नवाब मलिक यांचा दावा आहे. हा वाद मुंबई हायकोर्टात गेला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

दुसरीकडे, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनीही या प्रकरणात उडी घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका ट्विटरवर शेअर केली आहे. निलोफर मलिक खान आणि सना मलिक शेख यांनी कालच समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाशी संबंधित विवाहाचा दाखला आणि लग्नाच्या स्वागत सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली होती. यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असे लिहिलेले आहे. यानंतर आता नवाब मलिक यांनी हा फोटोबॉम्ब टाकला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button