फोकसराजकारण

नवाब मलिक खोटारडे, मी कधी दुबईला गेलोच नाही : समीर वानखेडे

मुंबई : नवाब मलिक खोटारडे आहेत आणि मालिकांवर या प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले. ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (एनसीबी) आणखी एक मोठा आरोप केला आहे. मालदीव आणि दुबईतील फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींकडून एनसीबीच्या वसुलीबद्दल ते बोलले आहेत. मलिकच्या आरोपावर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात राज्य सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कायम आहे. नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे आणि त्यांच्या बहिणीने मालदीव आणि दुबईमध्ये बॉलिवूड कलाकारांकडून वसुली केली, असा आरोप मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही तिकडे उपस्थित होते. समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. दरम्यान, मालदीवमधील फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील सदस्य तिथे उपस्थित होते, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अजून एक वळण लागण्याची शक्यता आहे. मात्र नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या बहिणीवर केलेल्या आरोपांना मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला.

शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही

एनसीबीकडून समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं, अशी माहिती दिली आहे.

आज सकाळी ९ च्या सुमारास सुपरस्टार शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची १० मिनिटं भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही शोधमोहीम राबवण्यात आली. दरम्यान एनसीबीच्या या कारवाईबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये शाहरुखच्या मन्नत या बंगल्यावर छापा टाकल्याची माहिती प्रसारित झाली होती. मात्र, कोणताही छापा टाकला नसून केवळ आर्यन खानसंबंधित काही कागदपत्रं गोळा करण्यासाठी मन्नतवर एनसीबीचे पथक गेल्याची माहिती समीर वानखेडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button