राजकारण

नेतृत्‍वावर प्रश्न उपस्थित करत ४ माजी मंत्र्यांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे राजीनामे

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्येकाँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या सात नेत्यांनी एकाच वेळी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्या नेत्यांमध्ये जीएम सरोरी, जुगल किशोर शर्मा, विकार रसूल, नरेश कुमार गुप्ता, अन्वर भट यांचा समावेश आहे. सोनिया गांधींशिवाय या नेत्यांनी माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रदेश प्रभारी रजनी पाटील यांनाही राजीनाम्याच्या प्रती पाठवल्या आहेत. हे सर्व नेते गुलाम नबी आझाद गटाचे असून पक्षनेतृत्व बदलाच्या निर्णयामुळे नाराज असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर पक्षाशी संबंधित मुद्द्यांवर त्यांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे.

हायकमांडकडे राजीनामे पाठवणाऱ्यांमध्ये चार माजी मंत्री आणि तीन आमदारांचा समावेश आहे. ते माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या जवळचे असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या काँग्रेस नेत्यांच्या राजीनाम्याच्या काही दिवसांपूर्वी आझाद जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर या नेत्यांनी प्रदेश काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधी वृत्तीमुळे हे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी उपमुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह आझाद यांच्या जवळच्या काही नेत्यांनी राजीनामा दिलेल्या नेत्यांपासून दुरावल्याचेही सूत्रांनी सांगितले. या नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्यात म्हटले की, त्यांनी त्यांच्या प्रश्नांकडे पक्षप्रमुखांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना वेळ देण्यात आला नाही. गेल्या वर्षभरापासून पक्षनेतृत्वाकडे भेटीची वेळ मागितली होती, मात्र त्यांना वेळ देण्यात आला नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे.

मीर यांची खिल्ली उडवत ते म्हणाले की, मीर यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष अत्यंत दयनीय स्थितीकडे वाटचाल करत आहे. पक्षातील अनेक नेत्यांनी राजीनामा देऊन इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे, परंतु काहींनी मौन बाळगण्याचा निर्णय घेतलाय. जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेसच्या कारभारावर काही नेत्यांनी कब्जा केल्याचा आरोपही त्यांनी केला. सूत्रांनी सांगितले की, काँग्रेस हायकमांडने आधीच स्पष्ट केले आहे की, कोणत्याही समस्यांचे पक्षीय व्यवस्थेनुसार निराकरण केले जाईल आणि माध्यमांद्वारे काहीही होणार नाही. काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडला लक्ष्य केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button