‘सिरम’ पाठोपाठ ‘भारत बायोटेक’च्या लसीच्या दरातही कपात
हैदराबाद : कोविशिल्ड पाठोपाठ आता कोवॅक्सिन लसीची किंमतही कमी करण्यात आली आहे. दोन्ही कोरोना लसी आणखी स्वस्त झाल्या आहेत. भारत बायोटेकेने आपल्या कोरोना लशीची नवी किंमत जारी केली आहे. कोवॅक्सिनचे दरही आता कमी करण्यात आले आहेत.
कोवॅक्सिन लसीचा प्रति डोस राज्य सरकारसाठी ६०० रुपये होता. तर खासगी हॉस्पिटलमध्ये याच लसीचा दर हा १२०० रुपये ठेवण्यात आला होता. पण आता राज्य सरकारसाठी कंपनीने किंमत कमी केली आहे. आता फक्त ४०० रुपये प्रति डोस ही लस उपलब्ध होईल. म्हणजे जवळपास २०० रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे.
याआधी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत कमी केली होती. कोविशिल्ड कोरोना लशीची सुरुवातीची किंमत प्रति डोस राज्य सरकारसाठी ४०० रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी ६०० रुपये होती. राज्य सरकारसाठी सीरमने आपले दर कमी केले आहेत. राज्य सरकारला ही लस आता ४०० ऐवजी ३०० रुपयांना दिली जाणार आहे. म्हणजे १०० रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे.