नवी दिल्लीः भारतात कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत असल्याने स्थिती बिकट बनली आहे. दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. यामुळे १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरणही खोळंबले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशात पुढच्या आठवड्यापासून रशियाची स्पुटनिक लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
पुढील आठवड्यापासून नागरिकांना रशियाच्या स्पुटनिक लसीचा डोस घेता येऊ शकेल. या लसीचे जुलैपासून भारतात उत्पादन सुरू होईल. स्पुटनिक लस भारतात दाखल झाली आहे. पुढच्या आठवड्यात ही लस बाजारात उपलब्ध होईल. रशियाच्या या लसीची मर्यादित प्रमाणात विक्री पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
देशात अधिकाधिक लस उपलब्ध करण्यासाठी सरकार प्रत्येक स्तरावर काम करत आहे. ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंतची लसींची उपलब्धता पाहता एकूण २१६ कोटी डोस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यापैकी ५५ कोटी डोस हे कोवॅक्सिन, ७५ कोटी कोविशिल्ड, ३० कोटी बायो ई सब युनिट लसीचे, ५ कोटी जायडस कॅडिला डीएनए, २० कोटी नोवा लसीचे, १० कोटी भारत बायोटेकच्या नेजल लसीचे, ६ कोटी जिनोवा आणि १५ कोटी डोस स्पुटनिक लसीचे उपलब्ध होतील. याशिवाय दुसऱ्या विदेशी लसींनाही मंजुरी मिळू शकते, अशी माहिती डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. ही लोकसंख्या ९५ कोटी इतकी आहे. या सर्वांच्या लसीकरणासाठी दोन्ही डोस मिळून २ अब्ज डोसची आवश्यकता आहे. ज्या लसी येत आहेत, त्या पुरेशा आहेत, असं पॉल म्हणाले. कोवॅक्सिन लसीचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देणार का? असा प्रश्न पॉल यांना विचारला गेला. कंपनीने या मागणीचे स्वागत केले आहे. एवढचं नव्हेत सरकारने इतर कंपन्यांसोबतही चर्चा केली आहे. या लसीमुळे जिंवत व्हायरसला संपवले जाते. यामुळे ही लस बीएसएल थ्री लेवलच्या लॅबमध्येच होऊ शकते. ही लॅब इतर कुठल्याही कंपनीकडे नाही. जी कंपनी अशी लॅब उभारून लस उत्पादन करू इच्छित असेल त्यांना खुली ऑफर आहे, असं डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केलं.