आता ‘रक्त’संकट; राज्यात आठवडाभर पुरेल इतकाच साठा

मुंबई : राज्यात कोरोनाची (Corona virus) दुसरी लाट आल्यामुळे रुग्णांच्या संख्येत विस्फोट झाला आहे. दुसरीकडे राज्यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. राज्यात आता फक्त 6 ते 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा (Blood supply) उपलब्ध आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली.
राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईसह राज्यातील रक्तसाठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना संपूर्ण माहिती दिली. ‘मी आज मुंबई आणि राज्यात इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांची माहिती घेतली. पुढील सहा ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा सध्या आहे, राज्यात कोरोना सुरू झाल्यापासून रक्त पुरवठा कमी झाला आहे’ अशी माहिती शिंगणे यांनी दिली. रक्तसाठा कमी होत असल्यामुळे आम्ही वेळोवेळी लोकांना आवाहन केले आहे, नियमित रक्तदात्यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करावे. राजकीय नेत्यांनीही त्यांचे वाढदिवस साजरा होत असताना रक्तदान शिबिर आयोजित करावे, असं आवाहनही शिंगणे यांनी केले आहे.