राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचे निधन
मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं करोनामुळे निधन झालंय. मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते.
अजित सिंह करोना संक्रमित असल्याचं २२ एप्रिल रोजी स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, फुफ्फुसात संक्रमण पोहचल्यानं त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. मात्री, त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि उपचारा दरम्यान गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र चौधरी अजित सिंह उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारघाचं प्रतिनिधित्व करत सात वेळा संसदेत दाखल झाले होते. त्यांनी केंद्रात नागरिक उड्डाण मंत्री पदाची जबाबदारीही हाताळली होती. अजित सिंह यांच्या निधनानं बागपतसहीत पश्चिम उत्तर प्रदेशात शोककळा पसरलीय. बड्या जाट नेत्यांमध्ये चौधरी अजित सिंह यांच्या नावाची गणती होत होती.
वडील आणि माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह आजारी पडल्यानंतर १९८६ सालापासून चौधरी अजित सिंह यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. १९८६ साली त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले. त्यानंतर १९८७ ते १९८८ पर्यंत ते लोकदल (ए) आणि जनता पक्षाचे अध्यक्षही होते. १९८९ मध्ये त्यांचा पक्ष विलीन झाल्यानंतर ते जनता दलाचे सरचिटणीस झाले.
अजित सिंह १९८९ मध्ये पहिल्यांदा बागपत मतदारसंघातून लोकसभेत दाखखल झाले. व्ही पी सरकारमध्ये त्यांना केंद्रीय मंत्रीपदही मिळालं. यानंतर ते १९९१ मध्ये पुन्हा एकदा बागपतमधून लोकसभेत पोहचले. यावेळी नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं. १९९६ मध्ये ते तिसऱ्यांदा काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत दाखल झाले. परंतु, यानंतर मात्र त्यांनी काँग्रेस आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला.