राजकारण

मुख्यमंत्री अजून गप्प का? : देवेंद्र फडणवीस

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

मुंबई : गेल्या काही दिवसात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतात. त्या अत्यंत चिंताजनक आहेत. या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन हे त्याहून चिंताजनक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोन प्रेस घेतल्या. पण त्यात त्यांनी गृहमंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले. तर काँग्रेस ही अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगळं बोलतात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या विषयावर मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलत करावं, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर विविध आरोप केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री हे प्रमुख आहे. त्यांनी बोललं पाहिजे. पण त्यांना माहिती आहे की या मुद्द्यावर बोलणे कठीण आहे. पण त्यांना माहिती आहे की यावर बोललं तर याची चौकशी करावी लागेल. त्याची चौकशी त्यांना करायची नाही. सरकारला वाचवण्यासाठी हे सर्व सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत अधिकृत व्यक्ती नाही. ते काही सरकारची व्यक्ती नाही. त्यांचे वक्तव्य सरकारचे अधिकृत मानले जाऊ शकत नाही. त्यांच्याकडे फार वेळ आहे. ते काही एवढे मोठे नाहीत. की त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे द्यायला हवीत, असेही फडणवीस म्हणाले.

काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर आले. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच 25 ऑगस्ट 2020 पासून तो दाबून का ठेवला? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोण यात लिप्त आहेत म्हणून त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला, असा सवाल फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

महाविकासआघाडीने सर्व नैतिकता पायाखाली तुडवली आहे. केवळ सत्तेसाठी या ठिकाणी हे सर्व काम चाललं आहे. त्या पलीकडे काहीही नाही. काँग्रेसला किती हिस्सा आणि वाटा मिळतो हे देखील त्यांनी सांगावे. राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. जर कोणत्या अधिकाऱ्याने खरे सांगितले तर तो भाजपचा एजंट ठरतो आणि जर हफ्ता वसुली केली तर तो काय शिवसेनेचा एजंट आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारांची भेट
भाजपचे शिष्टमंडळ मुंबईतील राजभवनात सकाळी 9.30 वाजता दाखल झाले. यानंतर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. भाजपच्या या शिष्टमंडळात देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार हे नेते सहभागी होते. जवळपास तासभर भाजपचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांची खलबतं सुरु होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button