मुंबई : राज्यात किराणा दुकान, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. ‘किराणा दुकानात आला दारूचा माल, आता लोकांचे होणार हाल…’, अशा काव्यमय शब्दात रामदास आठवले यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे.
राज्यातील १ हजार चौरस फुटापेक्षा अधिक जागा असलेल्या सुपर मार्केट, किराणा दुकान आणि मॉल्समध्ये वाईनची विक्री करता येणार असल्याच्या नव्या वाईन विक्री धोरणाला राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदिल दाखवला आहे. ठाकरे सरकारच्या याच निर्णयावर प्रमुख विरोधीपक्ष भाजपाकडून जोरदार विरोध सुरू असतानाच रामदास आठवले यांनीही या प्रकरणात उडी घेत सरकारवर टीका केली.
राजभवनात आज पर्यावरण पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्यांना पर्यावरण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या सोहळ्याला रामदास आठवले देखील उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आठवले यांनी ठाकरे सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणावर टीका केली. ‘किराणा दुकानात आला दारूचा माल…लोकांचे होणार हाल….’ अशा कवितेच्या ओळी ऐकवत त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध दर्शवला. सरकारच्या या निर्णयाविरोधात आरपीआय आंदोलन करेल, असा इशारा देखील आठवले यांनी दिला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देऊ असा विश्वास देखील रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. एप्रिल महिन्यात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपा आणि आरपीआय निवडणूक जिंकेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे निवडणूक लढतील यामुळे भाजपा आणि आरपीआय शिवसेनाला पराभूत करू, असं आठवले म्हणाले.
रावसाहेब दानवेंचा ठाकरे सरकारला टोला
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”राज्य सरकारमध्ये काय चाललंय हे सरकार मधल्यांनाही कळत नाही आणि जनतेलाही कळत नाही. आज वाईन विकायला चाललेत. उद्या बियर विकतील, पुढे दारू विकायला लागतील”, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
राज्यातील काही जिल्हे आम्ही दारूमुक्त केले होते. चंद्रपूरमध्येही आम्ही दारूबंदी केली. हे सरकार सत्तेवर आलं नाही तोवर दारुविक्री पुन्हा सुरू झाली. आता केवळ चंद्रपूरला दारू सुरू करून थांबले नाहीत. आतातर सगळ्या महाराष्ट्रात पानटपरीवर वाईन विकायला लागलेत, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
आज वाईन विकत आहेत. उद्या बियर विकतील, पुढे दारु विकायलाही सुरुवात करतील. या सरकारला उत्पन्न पाहिजे असेल तर उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक मार्ग आङेत. पानटपरीवर दारू विकून किंवा दुकानात दारू विकून पैसा उभं करणं हे योग्य नाही. महाराष्ट्राची संस्कृती अशी नाही. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी देखील रावसाहेब दानवे यांनी यावेळी केली आहे.
आमच्या सरकारने कोणत्याही राज्यात दारू विक्रीचा निर्णय घेतलेला नाही आणि घेणारही नाही असं म्हणत दानवेंनी भाजपाशासित इतर राज्यांमध्ये वाईन विक्री होत असल्याच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिलं आहे.
पिणारा कुठेही जातोच ना : बाळासाहेब थोरात
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे. या निर्णयावरून भाजपने जोरदार आक्षेप घेत विरोध सुरू केला आहे. पण, पिणारा कुठेही जातोच ना. वाईन आणि दारूमध्ये फार मोठा फरक आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीवरून राजकीय आखाडा तापला आहे. भाजपने कडाडून विरोध सुरू केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते जशास तसे उत्तर देत निर्णय पटवून सांगत आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी बोलत असताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपला फटकारून काढले.
वाईन विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळात हे शेतकऱ्याचे उत्पादन आहे हे पहिले लक्षात ठेवले पाहिजे, नाशिकमधील द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांनी धाडसाने काही गोष्टी केल्या आहे. असं आहे की, पिणारा कुठेही जातोच ना. वाईन आणि दारूमध्ये फार मोठा फरक आहे, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.