राज ठाकरेंची माझ्याशीही चर्चा; ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भेटणार : मुनगंटीवार
मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजप-मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. राज ठाकरे यांच्या परप्रांतियांबाबतच्या वक्तव्याच्या क्लिप्स चंद्रकांत पाटलांना पाठवण्यात आल्याचं वृत्त आहे. त्यातच आता भाजपचे पहिल्या फळीतील नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे. भविष्यात आमची युती झाली तर त्यात गैर काय, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. राज ठाकरे यांचा मलाही फोन आला होता. येत्या काही दिवसात मी त्यांची भेट घेईन, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगतिलं. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
समविचारी पक्ष एकत्र येत असतील तर त्यात गैर काय? भविष्यात काँग्रेस आणि भाजप सोडून कोणीही एकत्र येऊ शकतो, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ॲागस्टच्या पहिल्या आठवड्यात सुधीर मुनगंटीवार हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
राज ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या पार्किंग लॉटमध्ये ओझरती भेट झाली होती. त्याचवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविषयी माझी नेमकी काय भूमिका आहे, याच्या क्लिप्स तुम्हाला मी पाठवतो, असे राज ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना सांगितले होते. त्यानुसार मनसेकडून या क्लिप्स चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्यामुळे राज ठाकरे आगामी पालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी उत्सुक आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.