कोरोना रोखण्यात ठाकरे सरकार अपयशी : दरेकर

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर जोरदार निशाणा साधला. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटली असताना महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यात राज्य सरकार सपशेल फेल ठरले आहे. राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कोरोनामुळे राज्याची परिस्थिती वाईट होत चालली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती पूर्वपदावर आणावी असे दरेकर यांनी म्हटले आहे.
ठाकरे सरकारची जी भूमिका सर्वसामान्यांच्या रोजी रोटीवर परिणाम करेल अशी कुठलीही राज्य सरकारची भूमिका खपवून घेणार नाही. लसीकरणापासून ते कोविड केंद्रांपर्यंत आणि साहित्य पुरवण्यापासून सर्व यंत्रणा केंद्र सरकारने पुरविल्या आहेत. परंतु सर्व नियोजन पूर्णपणे या सरकारचे कोलमडलेले आहे. मग ते मॉनिटरिंग असेल मॅनेजमेंट असेल सर्व आघाड्यांवर हे सरकार फेल ठरले आहे याचे कारण त्यांच्या अंतर्गत कलह एवढा आहे की त्याच्यामध्येच ते पूर्णपणे बुडालेले आहेत. यामुळे तिन्ही पक्षांच्या सातत्याने येणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर पडल्याचे दिसते आहे. या सगळ्याची जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घ्यावी लागेल. परंतु कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री मौन धारण करुन बसले आहेत. हे अनाकलनीय आहे म्हणून सरकारने या सगळ्या गोष्टींचे गांभीर्याने विचार करावा किंबहूना एक गोष्ट निश्चित झाली आहे. देशातील इतर राज्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी ठरली असताना महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आपले सरकार पूर्णपणे फेल ठरले आहे.
केंद्र सरकारला, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला, आर्थिक आणि कृषी विभागाल विनंती करतो की महाराष्ट्राच्या परिस्थितीकडे लक्ष घालावे अशी विनंती करतो, कारण या सरकारचे आता सर्वसामान्य आणि महाराष्ट्राकडे लक्ष राहिलेलं नाही त्यांना फक्त सत्ता टिकवणे हेच लक्ष बनले आहे. म्हणून जनतेकडे लक्ष नसल्याने केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन परिस्थिती नियंत्रणात आणावे अशी विनंती केली असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
नाशिकमध्ये रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन करणाऱ्या कोरोनाबाधिताचा आज मृत्यू झाला. त्यापूर्वी नाशिकच्या दौऱ्यात आयुक्तांची भेट घेऊन बेडस, व्हेंटीलेटर उपलब्ध नाहीत, हे लक्षात आणून दिलं होतं. दौऱ्यावरून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यानाही कल्पना दिली होती. पण हे सरकार आणि प्रशासन झोपेतून जागं होत नाही. त्यामुळे या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि खुद्द सरकारविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली.