अध्यक्ष महोदय, आमच्यामागे ईडी लावा, पण मामीची सीडी नको…!
- अॅड. योगिनी बाबर
मुंबई : मुख्यमंत्र्यांची सुंदर, आधुनिक, नोकरी करणारी पत्नी असा नाव लौकिक मिळवत तिने आजवरच्या सर्व सौ. मुख्यमंत्र्यांना मागे टाकले. एक यशस्वी बँकर, एक आदर्श आई आणि एक आज्ञाधारक पत्नी अशा बहुआयामी व्यक्तिमत्वात मुंबईच्या मायानगरीने एक गायिका म्हणूनही भर टाकली… अशा अमृता देवेंद्र फडणवीस अर्थातच महाराष्ट्राच्या बहुचर्चित मामी…! सातत्याने राजकीय टिवटिव करीत त्या चर्चेत असतातच ! त्या पुन्हा एकदा आपल्या नव्या गाण्यामुळे भलत्याच चर्चेत आल्या आहेत. अर्थात या गाण्यातील त्यांचे सूर बरे लागले असले तरीही त्यांनी गायकीचा फार अट्टाहास करायला नको असा नाराजीचा आणि टीकेचा सूर नेटकऱ्यांनी मोठया उत्साहाने आळवलेला दिसतो आहे.
गायिका योहानीच्या ‘मनिके मागे हिते’ या मूळ श्रीलंकन गाण्याच्या हिंदी आवृत्तीचे अमृता फडणवीस यांनी गायन केले आहे. विशेष म्हणजे अमृता फडणवीस यांनी गायलेल्या या ‘मन ही मन तुझे चाहा, तू ही है मेरा जुनून, आयी तेरी याद आयी’ या गाण्याच्या गीत लेखनाचे श्रेय त्यांनी आपले पती देवेंद्र यांना दिले आहे. या दोघांच्या लग्नाच्या वाढदिवसाची खास भेट म्हणून त्यांनी हे गाणं रिलीज केलं असून ‘आओ कुछ तुफानी करते हैं…’ अशी टॅगलाईनही याला जोडली आहे. अर्थातच नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणेच याही गाण्याची खुमासदार खिल्ली उडवली असून एक से एक कमेंटसनी हसता हसता पुरेवाट केली आहे.
Admist the ongoing Heated Political Times,
take a Chill Pill with this Kool song !Lyrics by – Dev#AnniversarySpecial
Inspired by #ManikeMageHithe of Internet sensation #Yohani#HindiVersionOfManikeMageHithe pic.twitter.com/ibEazo7gUH— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 19, 2021
अनेक नेटकऱ्यांनी तर अमृता यांना मामी आम्ही हे गाणे नाही, पण या कमेंटस वाचण्यासाठी या लिंकवर आलो आहोत, अशी कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी शेती कायदे मागे घेतले त्याचा आनंद फारसा कुणी सेलिब्रेट करु नये म्हणून देवेंद्रजींनी हे गाणे ऐन मोक्यावर लाँच केल्याची टीकाही काहींनी केली आहे. याशिवाय ‘मी एकटाच का सहन करु, तुम्हीही माझ्या दुःखात सहभागी व्हा’ असा मामूंचा होरा दिसतो असेही काहीजण म्हणतात. तर नागनाथ राऊत यांच्यासह अनेकांनी ‘२०१४ नंतरच्या स्वातत्र्यानंतर उदयास आलेली भसाड गायिका’; राहुल तुपारे यांनी ‘बायकोच्या हट्टापुढे कोणाचे काही चालत नाही’, केटी यांनी ‘संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मामींना पुढील वर्षी पद्मश्री नक्की मिळणार’, अशा टीका केल्या आहेत. अक्षय शिंदे लिहितात, ‘अध्यक्ष महोदय वाटल्यास आमच्या मागे ईडी लावा, पण ही मामीची सीडी ऐकायला नका सांगू..’, डॉ. अरुणकुमार पाटील म्हणतात, ‘भारतीय स्वातंत्र्यानंतरचे आरएसएसचे आणि कंगणाची सांस्कृतिक ओळख करुन देणारे हे सुंदर गायन आणि नाचकाम आहे’, असे म्हटले आहे. नितिन म्हणतात, ‘एवढं काय पाप केलं आहे महाराष्ट्राच्या जनतेने की यांचे गाणे ऐकावे लागते, सेव्ह महाराष्ट्र’; अनिकेत काळे लिहितात, ‘मी होम थिएटरवर हे गाणं लावलं तर घरातले उंदीर, झुरळ पळून गेले… धन्यवाद मामी तुमचा काहीतरी उपयोग झाला’. सुशांत फराटे आपल्या कमेंटमध्ये लिहितात, ‘या एका कारणामुळे देवेंद्रजी सातत्याने महाराष्ट्रभर दौरे करत असावेत’, तर युवराज ठुबे लिहतात, ‘हे गाणं ऐकून मी जग साोडण्यासाठी चांद्रयान तयर केलं आहे, कोणाला माझ्यासोबत यायचं असेल तर चला’. विजय पुड लिहितात, ‘आपला कान आपली जबाबदारी’, विशाल पाटील लिहितात, ‘अध्यक्षमहोदयांवर आधीच अस्मानी, सुलतानी संकट असताना हे घरातलं मुलतानी संकट कोसळलं’, विजयकुमार लिहितात, ‘काय तो आवाज, काय ते एक्सप्रेशन, काय तो नखरा, काय तो झटका वा… असं वाटू लागलं. एक दगड घ्यावा अन कचं कचं डोक फोडून घ्यावं’. सगळ्यात भारी कमेंट दिली आहे, हेमंत नगरकर या नेटकऱ्याने, ते लिहितात, ‘एके रात्रीच्या नाजूक वेळी रुसलेल्या राणीच्या हंबरण्याला राजा बोलला, सख्ये तुझा आवाज किती गोड, एकदा ऐकला की दरबारी राजकारणाचा सारा शीण क्षणात नाहीसा होतो, आवाज कसला अमृतवाणीच ही! राणी हसली राजाचा प्रसंग निभावला, पण दुसऱ्या दिवसापासून प्रजेवर मात्र काळ ओढावला !’
एक ना अनेक जवळपास चार लाख डिसलाईक्सनी अमृतामामींच्या या हिंदी ‘मनिके मागे हिते’चे स्वागत करण्यात आले आहे. तर जेमतेम काहींनी त्यांच्या गायनाचे आणि या व्हीडिओसाठी त्यांनी केलेल्या अभिनयाचे कौतुक केले आहे. मात्र बहुतेकांनी या गाण्यातील त्यांचे हावभाव पाहून त्यांची तुलना पॉर्नस्टार सनी लिओनीसोबतच केली आहे. एकंदरच सालाबादप्रमाणे अमृतामामींचे पुन्हा एकदा एक नवे गाणे नव्या टीका, नव्या नाराजीच्या सुरात अनुभवायला मिळते आहे. एकंदरच सोशल मिडीयावर व्यक्त होण्याचे काही संकेत असतात, मात्र हे संकेत पायदळी तुडवण्यातच नेटकरी बिझी दिसतात.
अमृता फडणवीस यांनी प्रकास झा यांच्या ‘जय गंगाजल’मधून त्यांनी आपल्या गायन करिअरची सुरुवात केली. अमिताभ बच्चनसोबत ‘फिर से’ या अल्बममुळे त्या विशेष प्रकाशझोतात आल्या. बीग बींसह सर्वांनीच त्यांचे कौतुक केले होते. यानंतर मात्र त्यांच्या प्रत्येक गाण्याला टीकाच सहन करावी लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच्या वर्षभरातच अमृता यांना आपणही शास्त्रीय गायन शिकल्याचे स्मरले आणि बघता बघता पाच वर्षात डझनभर हिंदी, मराठी इंग्रजी गाण्यांची त्यांनी जणू वसुली केल्याप्रमाणे बरसात केली. नागपुरात असेपर्यंत त्या फक्त बँकर होत्या, मुंबईच्या मायानगरीत पाऊल टाकताच त्यांना ‘बी टाउन’ची ओढ वाटू लागली. अर्थातच सत्ता आणि पैसा असेल तर टॅलेंटची गरज नसते हे सत्य त्यांनीही जगले… त्या गात राहिल्या… यासाठी लागणारा पैसा, सत्ता असताना आणि नसताना कुठून आला याचा हिशेब त्यांना द्यावा लागत नाहीत, तोपर्यंत त्या गातच राहतील…!
म्हणूनच मामींचे गाणे कसे वाटले, त्यांचा आवाज कसा आहे, त्यांचे एक्सप्रेशन पाहून देवेंद्रजीसह बघणाऱ्यांना काय वाटते अशा कोणत्याही भानगडीत न पडता.. रविवारच्या सुस्तावलेल्या संध्याकाळी मलाही अध्यक्ष महोदयांसोबत तमाम नेटकऱ्यांना एकच विनंती करावीशी वाटली की, राजकीय सुंदोपसुंदीत, आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत तुम्हीही कंटाळलले असाल, तर गाणे नको पण गाण्यावरच्या कमेंटस नक्की वाचा आणि पोट धरुन हसा लेको… सध्या अवघ्या महाराष्ट्राला ‘टेन्शन फ्री’ करण्याचे काम आपल्या लाडक्या मामी फुकटात करतात हे काय कमी आहे का…?