
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) चौकशी करण्याची शिफारस माजी अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार यांच्या समितीने केली आहे. समितीची ही शिफारस फडणवीस यांना धक्का देणारी आहे.
जलयुक्त शिवारच्या योजनेची एसीबी चौकशी करतानाच काही योजनांची प्रशासकीय चौकशी करण्यात यावी, असेही समितीने सूचविले आहे. काही योजना राबवताना ई निविदा न काढता कामे देण्यात आली. काही योजनांमध्ये तांत्रिक बाबींना बगल देण्यात आली, असा ठपका समितीने ठेवला आहे. समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचदिवशी झालेल्या फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत दरवर्षी पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याची घोषणा झाली होती. त्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, योजनेवर हजारो कोटी रूपये खर्च करूनही त्याचा काहीच फायदा झाला नसल्याचा आरोप होत होता. याशिवाय कॅगने आपल्या अहवालात जलयुक्त शिवार योजनेवर ताशेरे ओढले होते. योजनेवर ९ हजार ७०० कोटी खर्च होऊनही त्याचा फायदा झाला नाही. प्रकल्पाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने झाली नाहीत.बीड जिल्हयातील कामांच्या दर्जावरही कॅगने प्रश्नचिन्ह लावले होते. काँग्रेसने जलयुक्त शिवारची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. आता समितीचा अहवाल सादर झाल्याने सरकार यावर काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बदनाम करण्याचा प्रयत्न; आशिष शेलार यांचा हल्लाबोल
जलयुक्त शिवार योजनेवर महाविकास आघाडीकडून करण्यात आलेल्या आरोपांवर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रयुत्तर दिलं आहे. राज्य सरकारवर आशिष शेलार यांनी निशाणा साधत हा बदनामीचा खेळ तुमच्यावरच उलटेल असा इशारा दिला आहे. तसेच जलयुक्त शिवाराच्या कामात चुका आणि अनियमितता बघणे हे महाराष्ट्राची बदनामी करण्यासारखे आहे. या बदनामीच्या खेळात राज्य सरकार केवळ राजकीय स्वर्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत आहे. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आशिष शेलार यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे की जलयुक्त शिवारच्या कामामध्ये अनियमितता बघणे म्हणजे हा केवळ बदनामीचा दुसरा खेळ ठाकरे सरकारने केला आहे. या बदनामीच्या खेळात राज्य सरकार केवळ राजकीय स्वर्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत आहे. जलयुक्त शिवाराची कामे जिल्हाधिकारी स्तरावर ठरली, लघुपाठबंधारे, जलसंधारण मंत्रालय, वनखाते अशा ७ वेगवेगळ्या खात्यातून मंजुरी मिळाली. देयक देण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याचा होता मंत्रालयात केवळ धोरण ठरले होते त्यामुळे यातून कोणा एका व्यक्तीला आणि योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने करु नये ते त्यामध्ये सफल होणार नाहीत.




