वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत ‘पुणे बी’ला विजेतेपद
ठाण्याचा 'लिगल ईगल' उपविजेता, अमित गणपुळे सामनावीर
नाशिक : पहिल्या सामन्यापासून बहारदार खेळीने आपले वर्चस्व कायम ठेवणाऱ्या वकिलांच्या ‘पुणे बी’ संघाने अंतिम सामन्यात ठाणे लिगल ईगल संघावर २६ धावांनी मात करत येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय वकील क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर झालेल्या सामन्यात ‘पुणे बी’ने विजेतेपदाचा सन्मान पटकावला. विजेत्या संघाला न्यायाधीश दिलीप घुमरे, अॅड. विवेकानंद जगदाळे यांच्याहस्ते चषक प्रदान करण्यात आला. स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, नाशिक जिल्हा वकील क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक बार असोसिएशनच्या वतीने वकिलांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. गतवर्षी कोरोना संक्रमणामुळे यात खंड पडला होता. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेबाबत वकिलांमध्ये उत्सुकता होती. राज्यभरातील वकिलांच्या ८० संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता, मीनाताई ठाकरे मैदानात स्पर्धेचे उदघाटन झाल्यानंतर २६ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत नाशिक शहरातील विविध १३ मैदानांवर या स्पर्धा घेण्यात आल्या. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचे सामने गोल्फ क्लब मैदानावर घेण्यात आले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ‘पुणे बी’ संघाने ‘ठाणे लिगल ईगल’समोर १८६ धावांचे आव्हान देताना ७ गडी गमावले. पुणे बीच्या अमित गणपुळेने ३५ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकार मारत ६० धावा काढल्या आणि ५ गाडी बाद करत अष्टपैलू कामगिरी केली त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. पुणे बीच्या अजय बदोडे याने ९ चौकारांसह ५६ चेंडूत ६६ धावा, अक्षय जाधवने ३१ चेंडूत ३७ धावा काढताना ३ चौकार आणि १ षटकार मारत चांगली साथ दिली. विजयासाठी १८७ धावांचा पाठलाग करताना ठाणे लिगल ईगलला २० षटकांत ८ गडी गमावून १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. पुणे बीच्या अमित गणपुळेने तीन, अजय बदोडेने दोन, नुरुद्दिन खानने दोन गडी बाद करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
ठाणे लिगल ईगलनेही आपल्या पहिल्या सामन्यापासून आक्रमकता कायम ठेवली होती. उपांत्य फेरीच्या सामन्यात ठाणे लिगल ईगलने ठाणे ए संघावर २ धावांनी निसटता विजय मिळवत अंतिम फेरी गाठली, तर पुणे बी संघाने नंदूरबार इलेव्हन संघावर ५४ धावांनी विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात विवेक केतकर आणि नरेश मकवाना यांनी पंच म्हणून काम पाहिले.