मुंबई: महाराष्ट्रानं देशाला सुसंस्कृत राजकीय परंपरा दिलेली आहे. इथं विरोध हा विचारधारेनुसार केला जातो. वैयक्तिक संबंध जपण्यावर भर दिला जातो. म्हणूनच पवारांच्या सत्कार सोहळ्यासाठी भाजपचा सर्वोच्च नेता प्रमुख पाहुणा असतो तर भाजप नेत्याच्या कार्यक्रमात दुसऱ्या एखाद्या पक्षाचा. पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचे भाग आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षभेद बाजुला ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या प्रकृतीची अजित पवारांकडे विचारपूस केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटी दरम्यान कालचा दिवस राजकीयदृष्ट्या मोठ्या घडामोडीचा ठरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. ह्या भेटीत मराठा आरक्षणापासून ते मुंबई मेट्रोपर्यंतच्या विविधी विषयांवर पंतप्रधानांना निवेदन दिलं गेलं. जवळपास पाऊण तासापेक्षा जास्त वेळ ही महत्वाची बैठक चालली. याच बैठकी दरम्यान पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे समजते. विशेष म्हणजे औपचारिक बैठक सुरु होण्यापूर्वी मोदींनी अजित पवारांकडे ही चौकशी केली आहे.
अजित पवारांनीही पवारांच्या तब्येतीबाबत मोदींना माहिती दिली यावर राष्ट्रवादीकडून ठोस अशी माहिती सांगण्यात आलेली नाही. पण दिल्ली वर्तुळात यावर चर्चा आहे. दोन महिन्यांपुर्वी शरद पवार यांच्यावर मुंबईत दोन शस्त्रक्रिया पार पडल्या होत्या. त्यांच्या पित्ताशय नलिकेत खडे आढळले होते. पवारांच्या ह्याच दोन शस्त्रक्रियांबाबत मोदींनी चौकशी केली. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतरही पवारांनी आवश्यक तेवढाच आराम करत कामाला लागले. हॉस्पिटलमधूनही त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी कामाची चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी व्हायरलही झाली होती. पवार आणि मोदी हे दोन्हीही राष्ट्रीय नेते आहेत त्यामुळेच एकमेकांच्या कामाबद्दल ते सार्वजनिक टिकाटिप्पणी करत असले तरीसुद्धा ते एकमेकांची आस्थेनं विचारपूस करण्याचं विसरत नाहीत हेच खरं.