काँग्रेसचे प्रभारी काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्वाचे; प्रफुल्ल पटेल यांचा नाना पटोलेंना टोला
नागपूर: नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना टोले लगावले आहेत. आम्ही काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच.के. पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी नानांना टोला लगावला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असं पटेल यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नानांना टोले लगावले. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलं नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचं त्यांनी ते करावं. त्यावर आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?, असा सवाल पटेल यांनी केला.
एच.के. पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात, असा चिमटा त्यांनी नानांना काढला. एच.के. पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर हे तिन्ही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. याचा अर्थ काय? इशारा तुम्हाला माहीतच आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे, त्यांच्याच नेतृत्त्वात सरकार चाललंय. महाविकास आघाडीला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. पुढेही राहीलच. बाकीचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही. नाना पटोले रोज बोलतात, त्याचं प्रतिउत्तर काय द्यावं? हे आम्हाला योग्य वाटत नाही, त्याचं सविस्तर उत्तर शरद पवार यांनी दिलंय. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. त्यावर रोज खुलासा करायचा हे आम्हाला योग्य वाटत नाही. एच.के. पाटील यांनी विधान केलं आहे. त्यामुळे नेमकं कुणाच्या बोलण्यावर जावं? कोण काय बोलतं त्यावर दररोज चर्चा करावी हे योग्य वाटत नाही, असंही ते म्हणाले.
आघाडीत नाराजी असल्यामुळे स्वबळाचे नारे दिले जात आहेत का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. त्याने काही फरक पडत असेल असे वाटत नाही. हा मीडिया इव्हेंट झाला आहे रोजचा, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचंही स्पष्ट केलं.