केरळमध्ये ‘एलडीएफ’ला पुन्हा स्पष्ट बहुमत; ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांचा पराभव
तिरुवनंतपुरम: केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ अर्थात डाव्या पक्षाच्या सरकारला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिलं आहे. हाती आलेल्या निकालानुसार एलडीएफला ९९ जागांवर विजय मिळाला आहे. तर विरोधी यूडीएफला ४१ जागांवर मिळाल्या आहेत. केरळमध्ये भाजपला खातंही उघडता आलेलं नाही. केरळमध्ये १४० जागांवर निवडणुका झाल्या. इथं बहुमतासाठी ७१ जागांची गरज असते.
‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांचा पराभव
या निवडणुकीत सर्वांचं लक्ष असलेले ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. पलक्कड विधानसभा मतदारसंघातून ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांचा पराभव झाला आहे. सुरुवातीला ते आघाडीवर होते मात्र नंतरच्या फेरीत ते चांगलेच पिछाडीवर गेले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे शफी परामबिल यांनी विजय मिळवला. परमबिल यांना ४२५३४ मते मिळाली तर श्रीधरन यांना ४१५६१ मते मिळाली. निवडणुकीच्या आधी ई श्रीधरन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचं मुख्य लक्ष्य केरळमध्ये भाजप सत्तेवर आणण्याचं आहे असं त्यांनी सांगितलं होते. ते स्वत:ला मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानत होते. केरळमध्ये भाजपनं विजयासाठी खूप मेहनत घेतली होती. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी केरळमध्ये प्रचार केला होता मात्र तिथे भाजप खातंही उघडू शकलेला नाही.
मुख्यमंत्री पिनराई विजयन आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपने या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. केरळमध्ये भाजपची जादू चालली नाही हे आता स्पष्ट झालंय.