राजकारण

परमबीर सिंग खंडणी प्रकरणात पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे, आशा कोकरे यांना अटक

सीआयडीची कारवाई

मुंबई : भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवालकडून कोट्यवधींची रोकड व स्थावर मालमत्ता बळकावल्याप्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यासह अनेक पोलिसांवर दाखल गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला. त्यानंतर मोठी कारवाई करत सीआयडीने पोलीस अधिकारी नंदकुमार गोपाळे आणि आशा कोकरे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणातील सहआरोपी आणि परमबीर यांचा निकटवर्तीय संजय पुनमिया याने राज्य सरकारमधील बड्या मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांची चौकशी व सरकार पाडण्याचा कट रचल्याचा तसेच परमबीर यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तक्रारदाराचा दावा केला आहे. त्यामुळे सखोल तपास करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेत सीआयडीकडे याचा तपास देण्यात आला आहे.

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील आरोपी असल्याने अग्रवाल याच्या तक्रारीनुसार २१ जुलैला परमबीर यांचे निकटवर्तीय पुनामिया, सुनील जैन, उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे, वरिष्ठ निरीक्षक आशा कोकरे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयुक्त हेमंत नगराळे यांनी एसआयटी नेमली होती. उपायुक्त निमित गोयल यांच्या नेतृत्वाखाली व तपास अधिकारी एसीपी एम. एम. मुजावर यांच्यासह ७ अधिकाऱ्यांचा त्यामध्ये समावेश होता. मात्र हे प्रकरण गुंतागुंतीचे आणि त्याला राजकीय व अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याने सीआयडीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्या भ्रष्ट व गैर कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्या असल्या तरी आतापर्यंत केवळ चार गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक सीआयडी व दोन ठाणे आयुक्तालयाकडे आहेत. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाही सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button