राजकारण

रेमडेसिवीर वाद : ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक पोलिसांच्या ताब्यात

देवेंद्र फडणवीस - प्रवीण दरेकरांची पोलीस ठाण्यात धाव

मुंबई: राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनवरून राजकीय वाद चांगलाच पेटला आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरुन राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये शनिवारी दिवसभर आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. यांनतर आता दमणमधील रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्मिती करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निर्यात बंदी असल्यामुळे या कंपनीकडे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा पडून असल्याचे आढळले आहे. या संचालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात धाव घेतली.

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. कोरोनाबाधित रुग्णांना लवकर बरे करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परंतु रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यासह देशात तुटवडा निर्माण झाला आहे. या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आहे. असे असताना ग्रुप फार्मा कंपनीकडे सुमारे २० लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याचे समजते. हा साठा महाराष्ट्रात विकण्यासाठी राज्य सरकारने या कंपनीला तातडीने परवानगी दिली आहे. तरीही इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत असे चित्र आहे. अशात गुजरात सरकारने इतर राज्यात रेमडेसिवीर निर्यात करण्यावर बंदी घातली. त्यानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा राजकीय वाद भडकला होता.

प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी काही दिवसांपूर्वी ग्रुप फार्मा या कंपनीला भेट दिली होती. ही कंपनी भाजपला ५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होती. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि लाड यांनी ही इंजेक्शन आपण महाराष्ट्र सरकारला देऊ, असे जाहीरही केले होते. या विषयी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत काही बैठकाही झाल्या होत्या. त्यानंतर राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू होईल असी शक्यता व्यक्त होऊ लागली होती.

दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे, असे मलिक यांनी म्हटले. त्यानंतर भाजप नेत्यांनी मलिक आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानंतर मलिक यांनी आक्रमक होत गुजरातमधील सर्व कंपन्यांचा माल जप्त करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली. ब्रुक फार्मा ग्रुप कंपनीचे मालक राजेश जैन यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेत, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आले. यानंतर राज्याचे विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड DCP कार्यालयात दाखल झाले होते. पोलिसांनी कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेतल्याने आता रेमडेसिवीरवरुन सुरु असलेल्या वादामध्ये ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता संचालकांवर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिकांना जनतेचे देणे-घेणे नाही : फडणवीस

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि काही मंत्र्यांना लोकांच्या जीवाचे काही देणे-घेणे नाही. यांना फक्त राजकारण करायचे आहे. मलिक यांनी केलेल्या आरोपांवर केंद्रीय मंत्री मांडविया यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी कंपन्यांची नावे सांगण्यास सांगितले होते परंतु कोणत्याही कंपन्यांचे नाव मलिक यांनी सांगितले नाही. उलट केंद्र सरकार महाराष्ट्राला मदत करते आहे. परंतु राज्य सरकारमधील मंत्री आपली जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर टाकण्याचे काम करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

नवाब मलिकांनी केला होता आरोप

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी निर्यातदार कंपन्यांचा दाखला देत रेमडेसीवीरच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्राने महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यास बंदी घातल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्राला रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी कंपन्यांना देण्यात आल्याचे मलिक म्हणाले. केंद्र सरकारने रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर देशातील १६ निर्यातदारांकडे २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी आहेत. निर्यातदारांना या कुप्यांची विक्री करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली नसल्याचे मलिक यांनी सांगत केंद्रावर गंभीर आरोप केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button