
नाशिक : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. परमबीर सिंग यांच्या नावे त्यांचा साथीदार संजय मिश्रीलाल पुनुमिया याने (संजय पुनुमिया हा परमबीर सिंग यांच्या एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे) नाशिकसह सिन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेनामी मालमत्ता खरेदी केली असून, त्यासाठी त्याने शेतकरी असल्याचा बनावट पुरावा जोडल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी संजय पुनुमिया हा एका आमदाराचा नातेवाईक असल्यामुळे त्यांच्या मदतीने जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींकडूनही हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. या आमदार पूर्वी भाजपमध्ये होत्या. त्या काळात बेनामी जागेचा व्यवहार झाल्याची चर्चा आहे.
सध्या संजय पुनुमिया हा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह एका खंडणीच्या गुन्ह्यात सहआरोपी म्हणून तुरुंगात असून, त्यामुळे त्याच्या शोधासाठी फारशी पावले सिन्नर पोलिसांकडून उचलली गेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संजय मिश्रीलाल पुनुमिया याने सिन्नर तालुक्यातील मौजे धारणगाव, मिरगाव, पाथरे येथे काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. ही जमीन खरेदी करताना संजय पुनुमिया याने शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून दोन सातबारे जोडले व त्याआधारे सिन्नरच्याच दुय्यम निबंधक कार्यालयात त्याचे खरेदीखत तयार केले गेले आहे. गेल्या काही वर्षांपासून सदरची कोट्यवधीची जमीन संजय पुनुमिया व त्यांचा मुलगा सनी या दोघांच्या नावे असून, संजय पुनुमिया याचा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी असलेल्या जवळीकतेतूनच ही खरेदीची प्रक्रिया सहज व सुलभपणे पार पडल्याची चर्चा आहे. काहींच्या मते पुनुमिया याच्या नावे परमबीर सिंग यांनीच या जमीन खरेदीत गुंतवणूक केली असण्याची शक्यता आहे.
संजय पुनुमिया याने सिन्नर तालुक्यात जमीन खरेदी करताना जोडलेले शेतकरी असल्याच्या पुराव्यांबाबत काही दिवसांपूर्वी सिन्नर पोलीस व तहसीलदार कार्यालयात मुंबईच्या अग्रवाल नामक इसमाने तक्रार करून संजय पुनुमिया हा बनावट शेतकरी असल्याचा व त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमिनी खरेदी केल्याचे म्हटले. त्याचा आधार घेऊन संजय पुनुमिया याच्या उत्तन (ठाणे) येथील खरेदीखतांची सत्यता पडताळणी केली असता, त्यातील एका जमीन खरेदीत बाबुलाल जे अग्रवाल व त्यांच्या बंधूंचे सातबारे उतारे जोडलेले दिसून आले, तर दुसऱ्या जमीन खरेदीत जोडण्यात आलेल्या सातबारा उताऱ्याच्या मालकांचा ठाण्याचे तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांनी शोध घेतला असता, त्याचे मालकही पुनुमिया नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संजय पुनुमिया याने बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन सदरच्या जमिनी खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
संजय पुनुमिया याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी असलेले संबंध तसेच मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन या नातेवाईक असल्याने सदरचे प्रकरण ‘हायप्रोफाईल’ गटात मोडले गेले आहे. गीता जैन पूर्वी भाजपमध्ये होत्या. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली आणि त्या आमदार झाल्या. त्या भाजपमध्ये असतात हे व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईचे बिल्डर श्याम अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांनी परमबीर सिंह, संजय पुनुमिया यांच्यासह सात जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदविलेला आहे. त्यात परमबीर सिंग फरार आहेत. पुुनुमियाच्या जमीन खरेदी प्रकरणात नाशिक जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीनेही मध्यस्थी चालविली आहे.