Top Newsराजकारण

केंद्रात आमचीच सत्ता; नारायण राणेंचा शिवसेनेला इशारा

चिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणेंनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. शिवसेनेत पूर्वीचे शिवसैनिक राहिलेले नाहीत. यांची उडी कुठपर्यंत जाते ते पाहू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा इशारा राणेंनी दिला आहे.

मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी ऐकिव माहितीच्या आधारे बोलणार नाही. मी काय सामान्य वाटलो का? मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे, असं म्हणत नारायण राणेंनी संताप व्यक्त केला. माझ्याविरोधात कोणी तक्रार दाखल केली, त्याचं नाव घेऊन बोला, असं राणेंनी पत्रकारांना सांगितलं. त्यावर शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी गुन्हा दाखल केल्याचं माध्यम प्रतिनिधींनी राणेंना सांगितलं. त्यावर कोण बडगुजर? मी त्याला ओळखत नाही, असं प्रत्युत्तर राणेंनी दिलं.

मी मुख्यमंत्र्यांवर बोललो की चिथावणीखोर विधान म्हटलं जातं. मग मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या विधानाचं काय, असा सवाल राणेंनी विचारला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यावर थपडा लगावण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली. ते विधान चिथावणीखोर नव्हतं का?, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे एखाद्या मुख्यमंत्र्यांला माहीत नाही ही गोष्ट गंभीर आहे. स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव की हिरक महोत्सव ही गोष्ट मुख्यमंत्री सचिवांना विचारतात. हा देशाचा अपमान आहे. राष्ट्रद्रोह आह, अशा शब्दांत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. मी शिवसैनिकांना भीक घालत नाही. नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर दगडफेक केली. दोन दगड भिरकावणं म्हणजे पुरुषार्थ नव्हे, अशा शब्दांत राणेंनी शिवसैनिकांचा समाचार घेतला.

तो क्रिमिनल ऑफेन्स नाही, पत्रकारांवरच राणे भडकले,

राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन पोलीस आयुक्तांनी त्यांच्या अटकेचे आदेश दिले. या आदेशावरुन नारायण राणेंनी माध्यमांवरच आगपाखड केलेली पाहायला मिळाली. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही. तुम्ही तपासून पाहा आणि मग टीव्हीवर दाखवा, नाही तर चॅनलविरोधात माझी केस दाखल होईल, अशी खुली धमकी राणेंनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे राज्यात राणेंविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झालेत. यातील एक गुन्हा नाशिकमध्ये दाखल आहे. त्या आधारेच नाशिक पोलीस आयुक्तांनी राणेंच्या अटकेचे आदेश दिले आहेत. याबाबत त्यांनी माध्यमांनाही माहिती दिलीय. मात्र, राणेंकडून हे मान्य करण्यास नकार येताना दिसतोय.

पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान?

आम्ही नागरिक आहोत, बॅनरबाजी करु. मी तुम्हाला मीडियाला उत्तर देण्यास बांधिल नाही. कोण शिवसेना, समोर उभं तरी राहावं.. नाशिक पोलीस आयुक्त काय राष्ट्रपती आहे की पंतप्रधान आहे आदेश काढायला. मी बोललो ते क्रिमिनल ऑफेन्स नाहीच. तपासून पाहावं. आमचं पण सरकार वर आहे, बघतो हे किती उड्या मारतात ते. ठरल्याप्रमाणे यात्रा होणार, असंही राणेंनी स्पष्ट केलं.

नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच…

आम्ही भीक घालत नाही असल्या शिवसैनिकांना. कोण आहेत समोर उभं तरी राहावं, मी नाही जुमानत त्यांना, ते आक्रमक झाले तर आम्ही डबल आक्रमक होऊ. आज ऑफिस तोडलं, उद्या आमच्या घरापर्यंत पोहोचले तर, नारायण राणेने शिवसेना सोडली, तेव्हाच शिवसेना गेली, असंही नारायण राणे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button