आता कार्यालयावर हल्ला झाला, तर ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’; बावनकुळेंचा इशारा
अमरावती : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळाला. शिवसैनिकांनी आक्रमक होत विविध शहरातल्या भाजप कार्यालयांवर हल्ले चढवले. कुठे दगडफेक झाली, तर कुठे सेना-भाजप कार्यकर्ते भिडले. यानंतर भाजपनेही आक्रमक होत तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा केली आहे. यातच, जर भाजपच्या कार्यालयावर हल्ला झाला तर ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे.
नारायण राणे यांच्या अटक आणि जामीन नाट्यानंतर अद्यापही शिवसेना आणि भाजपमधील वाद शमताना पाहायला मिळत नाही. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपच्या नेत्यांमध्ये अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. यापुढे अशी गंभीर घटना घडल्यास भाजप मागेपुढे पाहणार नाही, अशी ताकीद चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. तसेच डिसेंबरपूर्वी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली लावला नाही तर महाविकास आघाडी च्या मंत्र्यांना गावागावात फिरू देणार नाही असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जिल्ह्यात एक हजार कोटीचा धान खरेदी घोटाळा अधिकाऱ्या समक्ष झाला आहे. या घोटाळ्याची सीबीआयकडे तक्रार केलीय, अशी माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली.