Top Newsराजकारण

चंद्रकांतदादांना नाही; पण विखे, हर्षवर्धन पाटलांना मिळाली अमित शहांची भेट !

नवी दिल्ली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह राज्यातील काही नेत्यांनी चार दिवस दिल्लीत तळ ठोकला होता. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना मात्र मंगळवारीच शहा यांची भेट मिळाली. या भेटीत सहकार क्षेत्राविषयी चर्चा झाली. नव्या सहकार मंत्रालयामार्फत काय काय करता येऊ शकते यावर भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. भेट न मिळाल्याने चंद्रकांतदादा पाटील कालच मुंबईत परतले. दिल्लीत मात्र विखेंची शहा यांच्याशी भेट झाल्याने पाटील यांना भेट नाकारली गेल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.

त्यांनतर बोलताना दिल्ली दौऱ्यात नवीन काही नव्हतं. नेहमीसारखाच हा दौरा होता. देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे आणि मी अधूनमधून दिल्लीला जात असतो. पण पक्षातले तरुण नेते फारसे दिल्लीत येत नाही. ही नेक्स्ट जनरेशन देखील उभी केली पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामुळं राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय हा एक ग्रुप घेऊन आम्ही दिल्लीत आलो होतो.

केंद्र सरकारमध्ये नव्यानं मंत्री झालेल्या नेत्यांना भेटलो. त्यांचं अभिनंदन केलं. शुभेच्छा दिल्या. खाती समजून घेतली. पीयूष गोयल, नितीन गडकरी व रावसाहेब दानवे यांच्याही घरी गेलो. संघटनात्मकदृष्ट्या देखील काही भेटी झाल्या. रावसाहेब दानवे यांच्या घरी सोमवारी जेवण झालं. अमित शहा व नरेंद्र मोदी हे दोघे वगळता सर्वांच्या भेटी झाल्या, असं पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांची पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याबरोबर बैठक झाली. मात्र गृहमंत्री अमित शहा आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली नाही. चंद्रकांत पाटील यांनी मुंबई राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे अमित शहा हे चंद्रकांत पाटील यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जर काही नाराजी असती तर पक्षाध्यक्ष जेपी नड्डा हे मला का भेटले असते? असेही पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले. नड्डा यांच्याबरोबर झालेल्या भेटीत राज ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या भेटीची माहिती यावेळी त्यांनी नड्डा यांना दिली असल्याचं सांगितले. दरम्यान, दिल्लीतील पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी आपल्यावर सोपवतील, ती जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी आपण तयार आहोत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button