Top Newsराजकारण

चिराग पासवान यांचा पलटवार; पाचही बंडखोर खासदारांची पक्षातून हकालपट्टी

पटना : लोकजनशक्ती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यपदावरुन हटविण्यात आल्यानं चिडलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोरी करणाऱ्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. चिराग पासवान यांना आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून चिराग पासवान यांना पक्षात सामील करुन घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

बिहारच्या राजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते आणि खासदार चिराग पासवान यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलं. चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांनी चिराग यांना पक्षातून बाहेरचा रस्त दाखवला आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांना डच्चू देत पशुपती पारस यांना पाठिंबा देत नेतेपदी निवड केली होती. लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी ‘मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे’, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली होती. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली.

एनडीएची साथ सोडून तुम्ही आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी थेट ऑफर राजदकडून चिराग पासवान यांना देण्यात आली आहे. आता चिराग पासवान नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई बिरेंद्र यांनी चिराग पासवान यांच्यासमोर एक अनोखी ऑफर ठेवली आहे. चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत यावं आणि त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्यावा. सध्याची परिस्थिती दोन युवा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करुन चिराग पासवान यांनी केंद्रात राहून दिल्लीतलं राजकारण सांभाळावं, अशी ऑफर राजद आमदार भाई बिरेंद्र यांनी दिली आहे.

चिराग पासवान भावूक

स्वपक्षीय आणि कुटुंबीयांनीच दगाबाजी करून पक्षावर कब्जा केल्याने दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना जबरदस्त धक्का बसला आहे. काका पशुपती पारस यांनी केलेली बंडखोरी आणि इतर नेत्यांकडून त्याला मिळालेली साथ यावर चिराग पासवान यांनी मौन सोडत प्रथमच भाष्य केलं आहे. या घटनाक्रमावर बोलताना चिराग पासनाव यांनी भावूक होत पक्ष आणि कुटुंबाला एकजूट ठेवण्यात आपण अपयशी ठरलो, असे म्हटले आहे.

चिराग पासवान यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काका पशुपती पारस यांना लिहिलेली काही पत्रे शेअर केली आहेत. दरम्यान, या ट्विटमध्ये चिराग पासवान म्हणाले की, माझ्या वडिलांनी स्थापन केलेला हा पक्ष आणि माझ्या कुटुंबाला एकजूट ठेवण्याचा प्रयत्न मी केला. मात्र त्यात मी अयशस्वी ठरलो. पक्ष हा मातेसमान असतो. त्यामुळे आईची फसवणूक करता कामा नये. लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्यांचे मी आभार मानतो.

दरम्यान, लोकजनशक्ती पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सूरजभान सिंह यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या पाच दिवसांत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार आहे. आता सूरजभान सिंह यांच्या अध्यक्षतेखालीच पक्षाची बैठक होईल. तसेच येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रीय कार्यकारिणीचीही बैठक आयोजित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button