
पाटणा : ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये होणारा भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना रद्द करण्याच्या मागणीनं आता जोर धरला आहे. याआधी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी भारत-पाक सामना रद्द करण्याबाबत विचार करण्याची मागणी केली होती. आता बिहारचे उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनीही सामना रद्द करण्याचा सूर आळवला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये दुसऱ्या राज्यातील नागरिकांची हत्या होत आहे हे अतिशय दु:खद आहे. पाकिस्तानकडून भारतात दहशतवाद पसरवण्याचं जे काम सुरू आहे ते पाहता भारत-पाक सामना रद्द करायला हवा, असं किशोर प्रसाद म्हणाले. पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतानं सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हवा, असंही ते म्हणाले. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धा यूएई आणि ओमानमध्ये खेळविण्यात येत असून येत्या २४ ऑक्टोबर रोजी भारताची पाकिस्तानविरुद्ध लढत होणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
काँग्रेस नेते आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनीही याप्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. जम्मू-काश्मीरमधील घटना नक्कीच निषेधार्ह आहेत. पण यासाठी सामना रद्द करता येणार नाही. आयसीसीची स्पर्धा आहे आणि आयसीसीसोबत आपली कमिटमेंट आहे, असंही शुक्ला म्हणाले.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांचा उच्छाद सुरू असून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील बिहारी नागरिकांना लक्ष्य केल्याचं दिसून येत आहे. गेल्या १३ दिवसांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९ जवान शहीद झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारत-पाक सामना रद्द करण्याच्या मागणीनं जोर धरला आहे.
भारत आणि पाकमधील संबंध सध्या तणावाचे आहेत. तर सामना रद्द करण्याबाबत विचार केला गेला पाहिजे, असं गिरीराज सिंह म्हणाले होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पाणीपुरीवाल्याची हत्या केली होती. त्यानंतर या पाणीपुरीवाल्याच्या वडिलांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.