म्हाडाची मुंबईतील एकही इमारत धोकादायक नाही !
मुंबई : मुंबईत पावसाळ्यात इमारती कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी म्हाडाकडून मान्सूपूर्व तयारीसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. यातच धोकादायक इमारतींचा शोध घेण्यासाठी म्हाडाने आत्तापर्यंत तब्बल ९०४८ इमारतींचे सर्वेक्षण केले असून यामध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसळकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे म्हाडाच्या इमारतींमध्ये काही अपघात झाल्यास तात्काळ मदतीसाठी नियंत्रण कक्ष सुरु केल्याचे तसेच संक्रमण शिबीरे राखीव ठेवली असल्याचे म्हाडाने स्पष्ट केले आहे.
मुंबईत म्हाडाच्या १४ हजार ७५५ इमारती असून त्यामध्ये लाखो कुटुंब वास्तव्यास आहेत. यात जुन्या इमारतीच्या दुरुस्तीचे काम म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून केले जात आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची कामे झाली आहेत, सध्या पावसाळ्यात कोणताही अपघात घडू नये म्हणून म्हाडाने आत्तापर्यंत ९ हजार ४८ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्यामध्ये एकही इमारत धोकादायक नसल्याचे आढळले आहेत. तसेच उर्वरित इमारतींचेही लवकरचं सर्वेक्षण पूर्ण केल जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्याचबरोबर एखादी इमारत धोकादायक असेल तर रहिवासी, लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून द्यावे असे आवाहन घोसाळकर यांनी केले,
यात एखादा अपघात झाल्यास किंवा इमारत धोकादायक असल्याबाबत रहिवाशांची तक्रार आल्यास तेथील काम तत्काळ करण्यासाठी चार झोनमध्ये ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच म्हाडाचे अनेक कर्मचारी निवृत्त झालेले असल्याने पुरेशा मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर २३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.
यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादी इमारतखाली करावी लागली तर तेथील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कांदिवली, महावीरनगर येथे १३५ संक्रमण शिबीरे राखावी ठेवण्यात आली आहेत तर पुनर्रचित इमारतींमधीलही काही खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत मिळावी म्हणून ताडदेव येथे नियंत्रण कक्ष सुरु केला असून ०२२२३५१७४२३ या क्रमांकावर संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.