Top Newsराजकारण

ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केले सराईत गुन्हेगाराला मुख्य साक्षीदार !

मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या विरुद्ध केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे एनसीबी अधिकाऱ्यांच्या अडचणीत निश्चित वाढ झाली आहे. आता या प्रकरणात ज्या किरण गोसावीला एनसीबी मुख्य साक्षीदार सांगत आहे, तो गोसावी एक सराईत गुन्हेगार असल्याचा खुलासा होत आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या माहितीनुसार किरण गोसावी विरुद्ध एकूण तीन गुन्हे दाखल आहेत.

यामध्ये लोकांची फसवणूक करुन लाखो रुपये घेणे, धमकी देण्यासारखे गुन्हे आहेत. काही गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झाली आहे तर एकामध्ये तो अद्यापही फरार असल्याचं रेकॉर्डवर आहे. म्हणून इथे प्रश्न उपस्थित होतो की एक फरार आरोपी इतक्या मोठ्या केसमध्ये एनसीबीचा प्रमुख साक्षीदार कसा होऊ शकतो? एक फरार आरोपी इतक्या मोठ्या केसमध्ये आर्यन खान सारख्या हाय प्रोफाईल आरोपीला आपल्या ताब्यात घेऊन कसा जाऊ शकतो?

आरोपी किरण प्रकाश गोसावी याने मे २०१८ मध्ये फेसबुकवरून मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील तरुणाची ३ लाख रुपयांची फसवणूक केली होती. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी २९ मे २०१८ रोजी गुन्हा दाखल केला होता. परंतु, तो सापडला नसल्यामुळे फरार घोषित करण्यात आले होते.

नवाब मलिक यांनी आरोप केलेला किरण गोसावी हा ठाण्यातील ढोकाळी इथला राहणारा आहे. त्यावर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा कलम ४२० अंतर्गत म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा आहे. २०१५ साली दाखल झालेल्या या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक देखील केली होती. एका व्यक्तीला नोकरीचे आमिष दाखवून हजारो रुपये या किरण गोसावीने त्या व्यक्तीकडून उकळले होते. त्यामुळे पोलिसांनी किरण गोसावीला अटक केली होती. त्यानंतर या केसमध्ये चार्ज शीट फाईल करून सध्या केस कोर्टात प्रलंबित आहे.

किरण गोसावी विरुद्ध तिसरा गुन्हा मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्यात दाखल आहे. अंधेरी पोलीस स्टेशनमध्ये ३ जानेवारी २००७ ला व्यंकटेशम शिवा वायरवेल नावाच्या तक्रारदारने किरण गोसावी विरुद्ध तक्रार दिली. व्यंकटेशमने आरोप केला होता की किरण गोसावी आणि विनोद मकवाना या दोन्ही आरोपींने त्याच्या क्रेडिट कार्डची डिलिव्हरी न देता त्यांच्या क्रेडिट कार्डने १७ हजार ५०० रुपयांची शॉपिंग केली. या प्रकरणात दोघांनीही मे २००७ मध्येच पोलिसांनी अटक केली होती. आणि कोर्टात आरोपपत्रही दाखल केलं होतं. पण नंतर याप्रकरणात गोसावी आणि दुसऱ्या आरोपींना निर्दोष मुक्त करण्सात आलं.

ड्रग्ज पार्टीत सहभागी झाल्याच्या आरोपावरून आयर्न खानला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा किरण गोसावी सोबतचा फोटो व्हायरल झाला होता. किरण गोसावी याने आर्यन खानसोबत सेल्फी काढली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत किरण गोसावीवर आरोप करत एनसीबीच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता ज्या केसमध्ये किरण गोसावी फरार आहे, त्या केसमध्ये त्याला अटक करण्याची तयार पुणे पोलीस करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस गोसावीचा शोध घेत आहेत आणि त्याला लवकरच अटक केली जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button