अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह १० ठिकाणी सीबीआयचे छापे
देशमुख यांच्या अटकेची शक्यता
मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल केला आहे. तसेच सीबीआयने आज अनिल देशमुखांचे घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे असून ते कोर्टात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल देशमुख यांची १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ११ तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोर्टाने सीबीआयला १०० कोटी वसुलींच्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून २ ते ३ लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला ४० ते ५० कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.
पीपीई किट्स घालून सीबीआयच्या अधिकाऱ्यांची छापेमारी
अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआय अधिकाऱ्यांनी पीपीई किट्स घालून छापेमारी केली. यावेळी एक काळी बॅग आणि दोन मोठ्या पिवळ्या पिशव्याही सीबीआय अधिकाऱ्यांच्या हातात दिसत होत्या. त्यामुळे या बॅग आणि पिशव्यांमध्ये नक्की काय आहे, याचे गूढ वाढले आहे. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर पहाटेच सीबीआयने छापे मारले आहेत. ही छापेमारी करताना स्थानिक पोलिसांना त्यांची गंधवर्ताही देण्यात आली नव्हती. छापेमारीचं वृत्त कळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढवला आहे.
अनिल देशमुख हे नागपूरमध्ये आहेत. त्यांच्या नागपूर सिव्हिल लाईन परिसरातील निवासस्थानीही सीबीआयने छापा मारला आहे. पीपीई किट्स घालून काही लोक घरात झाडाझडती घेताना दिसत होते. देशमुख यांच्या स्वीय सहायकाच्या घरावरही सीबीआयने छापे मारले असून त्यांच्याकडूनही सीबीआय माहिती घेत आहे.
गृहमंत्री-मुख्यमंत्र्यांची चर्चा
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या घरावर सीबीआयने छापे मारल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या दोन्ही नेत्यांमध्ये प्रदीर्घ चर्चा सुरू होती. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
प्राथमिक अहवाल कोर्टात आल्यानंतर काय करायचं ते पाहू : संजय राऊत
अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सीबीआय आपलं काम करत आहे. सीबीआयचा प्राथमिक अहवाल कोर्टात येईल. तेव्हा काय करायचं ते पाहू. सीबीआयचा एक अजेंडा आहे. कोर्टाची ऑर्डर आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही. त्यामुळे सीबीआयच्या कारवाईवर लगेचच प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य नाही. देशमुखांनी त्यांचं म्हणणं सीबीआयकडे मांडलं आहे. सीबीआयचा प्राथमिक रिपोर्ट कोर्टाकडे जाईल. त्यानंतर काय करायचं ते पाहू, असं राऊत म्हणाले. सीबीआय त्यांचं काम करत आहे. कोर्टाने आपलं काम केलं आहे. महाविकास आघाडी सरकारही आपलं काम करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ही तर सोची समझी चाल : मुश्रीफ
ही सोची समझी चाल आहे हे मी आधीच सांगितलं होतं. एका पत्रावरून इतकी मोठी कारवाई होऊ शकते का? हे अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं कारस्थान आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडी चौकशी लावली, लवकरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. देशमुख यातून निर्दोष बाहेर पडतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
एका पत्राने एवढी मोठी कारवाई होऊ शकते का असा सवाल करत भाजपची ही राजकीय खेळी असून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे. पण, अशा प्रयत्नाने सरकार अस्थिर होणार नाही, भाजपचा हा प्रयत्न कदापिही यशस्वी होणार नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.